अफगाण शरणागतींना भारताचे दरवाजे खुले

नवी दिल्ली/काबूल | वृत्तसंस्था |
मवाळ चेहरा धारण करीत तालिबान्यांनी अफगाणिस्तानात शांततेची आणि स्त्रियांना इस्लामच्या चौकटीत मोकळीक देण्याची हमी दिली असली तरी तालिबानी राजवटीचा कहारी अनुभव असल्याने अफगाण सोडण्याकडे जनतेचा कल वाढला आहे. अफगाणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणतानाच आश्रयाला येऊ पाहणार्‍य अफगाणी नागरिकांनाही विशेष व्हिसा देऊन मदत करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ सुरक्षाविषयक समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, मदतीसाठी भारताकडे नजर लावून असलेल्या आपल्या अफगाणिस्तानातील बंधू-भगिनींना मदत करणे आवश्यक आहे. तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही मोदी यांनी दिले. भारतीयांना परत आणण्याबरोबरच अफगाणी निर्वासितांनाही आश्रय देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

अफगाणिस्तानमध्ये राहणार्या सर्व भारतीय नागरिकांची अचूक माहिती मिळवण्याच्या कामाला आणि त्यांना तेथून मायदेशी आणण्याला सरकारचे प्राधान्य राहील, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, कॅबिनेट सचिव राजीव गौबा, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला आणि अफगाणिस्तानमधील भारताचे राजदूत रुद्रेंद्र टंडन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे बाहेर असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.

सपा खासदारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा
उत्तर प्रदेशच्या संभल मतगारसंघातील समाजवादी पक्षाचे लोकसभेतील ज्येष्ठ खासदार शफीकुर रेहमान बर्क यांनी तालिबान्यांच्या कृतीचं समर्थन करतानाच त्यांची तुलना भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी केली आहे. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी लढला होता. त्यांना स्वतंत्र व्हायचं आहे. ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. आपण त्यात हस्तक्षेप कसा करू शकतो? असं शफीकुर रेहमान म्हणाले होते. या प्रकरणी संबंधित खासदार आणि इतर दोन जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version