| नवी दिल्ली | वृत्तसंंस्था |
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे पुरुष क्रिकेट संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. अंतिम सामन्यामध्ये हे दोन संघ भिडण्याची पूर्ण शक्यता आहे.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याची सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 14 ऑक्टोबरला हे दोन संघ अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहेत. मात्र, त्याआधीही हे दोन्ही संघ भिडण्याची शक्यता आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हा संघर्ष पाहायला मिळत आहे.
वास्तविक, आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नेपाळचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, त्याचबरोबर पाकिस्तानने हाँगकाँगचा पराभव करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी तर पाकिस्तानचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. भारतीय संघ बांगलादेशच्या तुलनेत बलाढ्य आहे, तर अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तान संघ मजबूत आहे. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान आपापल्या उपांत्य फेरीतील सामने जिंकून अंतिम फेरीत सहज प्रवेश करू शकतात, असे म्हणता येईल. भारतीय संघ 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 06.30 वाजता उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. त्याच दिवशी सकाळी 11.30 वाजता पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा सामना सुरू होईल. आशियाई क्रीडा स्पर्धेतील क्रिकेटचा अंतिम सामना 7 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता होणार आहे.