27 ऑगस्टपासून श्रीलंकेत स्पर्धेला होणार सुरुवात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
यंदाच्या आशिया चषक 2022 च्या क्रिकेट स्पर्धेचे यजपानपद श्रीलंका भूषविणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले असून, पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी, तर अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेने याबाबतची माहिती ट्विटरद्वारे दिली. ही स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील सामना प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. टीम इंडिया हा आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.
आतापर्यंत ही स्पर्धा 14 वेळा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 1984 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती. भारतीय संघ 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये चॅम्पियन ठरला आहे. त्याचवेळी श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते. पाकिस्तानने 2000 आणि 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.
पाच संघ निश्चित
सहा संघांच्या या स्पर्धेत आशिया खंडातील पाच संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. हे संघ भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान आहेत, तर सहावा संघ क्वालिफायर सामन्यांच्या आधारे निश्चित केला जाईल.
अध्यक्ष म्हणून जय शाह
एशियन क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीत सन 2024 पर्यंत जय शाह हे एशियन क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांच्या सहमीने घेण्यात आलेलया निर्णयामुळे शहा यांच्या कार्यकाळ एक वर्षाने वाढणार आहे.
पहिले पाकिस्तानात होणार होते आयोजन
आशिया चषक 2020 मध्ये पाकिस्तानमध्ये होणार होता, परंतु त्यानंतर कोरोना महामारीमुळे तो एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर 2021 मध्येही ती आयोजित करता आली नाही आणि त्यानंतर 2022 मध्ये श्रीलंकेत टी-20 फॉरमॅटमध्ये स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. शनिवारी 19 मार्च रोजी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर औपचारिकपणे सहमती झाली आहे.