दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करणार्या भारताच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाल्याचं नुकतंच एका सर्वेक्षणाच्या अहवालावरून समोर आले आहे. स्वीस एअर मॉनिटरिंग बॉडी खटअळी ने हा सर्वे केला असून, त्यानुसार बांगलादेश आणि पाकिस्तानच्या पाठोपाठ भारत हा जगभरातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे. ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट 2023’च्या निष्कर्षांनुसार 134 देशांच्या यादीत भारताचा प्रदूषित हवेच्या निकषांवर तिसरा क्रमांक लागतो. त्याशिवाय जगभरातील सर्वाधिक प्रदूषित 50 शहरांमध्ये एकट्या भारतातील 42 शहरांचा समावेश असून, सातत्याने चौथ्यांदा जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून दिल्लीचे नाव पुढे आले आहे.
जगभरातील विविध देशांमधल्या हवेचा दर्जा तपासण्यासाठी पीएम 2.5 चे प्रमाण हे मापक वापरण्यात आले होतं. त्यानुसार भारतात प्रत्येक क्युबिक मीटर क्षेत्रात 54.4 माक्रोग्रॅम पीएम 2.5 चे केंद्रीकरण झाल्याचं निदर्शनास आले. बांगलादेशमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच 79.9 मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर तर त्यापाठोपाठ पाकिस्तानमध्ये हे प्रमाण 73.7 मायक्रोग्रॅम प्रतीक्युबिक मीटर इतकं आढळून आले.
दरम्यान, एकीकडे सर्वाधिक प्रदूषित देशांच्या यादीत भारत तिसर्या स्थानी असताना दुसरीकडे सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातल्या तब्बल 42 शहरांचा समावेश आहे. जहभरातलं सर्वाधिक प्रदूषत शहर बिहारमधील बेगुसराय ठरलं असून, त्यापाठोपाठ गुवाहाटी व दिल्ली या दोन शहरांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो.
2023मध्ये बेगुसरायमध्ये प्रती क्युबिक मीटर पीएम 2.5 चं प्रमाण 118.9 मायक्रोग्रॅम इतकं आढळून आलं. गेल्या वर्षी हेच प्रमाण तब्बल 19.7 इतकं कमी होतं. गुवाहाटीमद्ये हेच प्रमाण 2022 मधील 51 वरून 2023 मध्ये तब्बल 105.4 मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर इतकं वाढल्याचं आढळून आले आहे. दिल्लीत हेच प्रमाण याच काळात 89.1 वरून 92.7 मायक्रोग्रॅम प्रती क्युबिक मीटर इतकं वाढल्याचं दिसून आले आहे.
भारतातील इतर शहरे कोणती? बेगुसराय, गुवाहाटी आणि दिल्लीव्यतिरिक्त ग्रेटर नोएडा (11), मुझफ्फरनगर (16), गुरगाव (17), अराह (18), दादरी (19), पाटणा (20), फरिदाबाद (25), नोएडा (26), मीरत (28), गाझियाबाद (35) आणि रोहतक (47) या शहरांचा या यादीत समावेश आहे.
कशी गोळा केली माहिती? दरम्यान, या सर्वेक्षणासाठी नेमकी माहिती कशी गोळा करण्यात आली, याबाबतही खट-ळी कडून स्पष्टीकरण देण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी 134 देशांमधील 7 हजार 812 ठिकाणी उभारण्यात आलेल्या तब्बल 30 हजार एअर स्टेशन्सच्या माध्यमातून माहिती गोळा करण्यात आली.