भारताचे कांस्यपदकावर शिक्कामोर्तब

भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला
41 वर्षांनंतर ऑलिम्पिकमधील पदकाचा दुष्काळ संपला

| टोकिया | वृत्तसंस्था |
भारतीय हॉकी संघाने इतिहास रचत आक्रमक जर्मनीवर मात करत कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले आहे. तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष संघानं धमाकेदार खेळी करत ऑलिम्पिक पदक पटकावलं आहे. अटीतटीच्या सामन्यात भारतानं जर्मनीचा 5-4 अशा फरकाने पराभव केला.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. सामना सुरु झाल्यावर अवघ्या काही मिनिटांतच पहिला गोल डागत जर्मनीनं आघाडी घेतली होती. पण, भारतानं आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं. भारताचा गोलकिपर श्रीजेशनं उत्तम खेळी करत जर्मनीचे अनेक गोल परतवून लावले. श्रीजेशच्या अभेद्य भिंतीमुळेच भारताचा विजय सोपा झाला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
हॉकीमध्ये भारताना आपलं शेवटचं पदक 1980 मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं. त्यावेळी वासुदेवन भास्करन कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्त्वात भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत भारताचं सर्वात चांगलं प्रदर्शन 1984 च्या लॉस अ‍ॅजलोसमध्ये होतं. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ पाचव्या स्थानावर होता. आजच्या विजयानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतानं ऑलिम्पिक हॉकीमधील पदकांचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे.

विक्रमवीर भारत-
वासुदेवन भास्करनच्या नेतृत्वाखाली 1980 मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. आजच्या पदाकासोबतच ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताच्या पदकांची संख्या 12 झाली आहे. यापैकी 8 सुवर्णपदकं, एक रौप्यपदक आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. असा विक्रम करणारा भारतीय हॉकी संघ जगभरातील एकमेव संघ आहे.

पंजाबी खेळाडूंची ‘बल्ले बल्ले’ –
देशाचा राष्ट्रीय खेळ असल्याने हा विजय सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा अनमोल विजय मिळवून देणार्‍या खेळाडूंवरही कौतुकांचा वर्षाव होत असतानाच पंजाब सरकारने हॉकी संघात खेळणार्‍या त्यांच्या राज्यातील खेळाडूंना तब्बल 1 कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं आहे. पंजाबचे क्रीडामंत्री राणा गुरमीत सोढी यांनी ट्विट करत ही माहिती दिली. पुरुष हॉकी संघात कर्णधार मनप्रीत सिंगसह हरमनप्रीत सिंग, रुपींदर पाल सिंग, हार्दीक सिंग, दिलप्रीत सिंग, शमशेर सिंग, गुरजंत सिंग आणि मनदीप सिंग यांचा समावेश आहे.

जर्मनीवर भारी पडली ‘ग्रेट वॉल’ –
सामन्यातील शेवटचे सहा सेकंद शिल्लक होते तेव्हा जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. ही जर्मनीची शेवटची संधी होती. कारण हा गोल झाल्यास सामना बरोबरीत सुटणार होता, तर दुसरीकडे भारताने हा गोल वाचवल्यास 41 वर्षांनी पदकावर नाव कोरणार होता. पंचांनी शिट्टी वाजवताच जर्मनीने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय गोलपोस्टजवळ भिंत बनून उभ्या असणार्‍या गोलपकीपरने म्हणजेच श्रीजेशने हा प्रयत्न हाणून पाडला आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. अनेकांनी त्याला ‘ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ असं म्हटलं आहे.

कोरोनायोद्ध्यांना विजय समर्पित – मनप्रीत
भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने हा विजय कोरोनायोद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचार्‍यांसाठी समर्पित करत असल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे मनप्रीतने संपूर्ण भारतवासियांची मने जिंकली असून, देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version