बांगलादेशविरुद्ध घेतला पराभवाचा बदला
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
19 वर्षाखालील विश्व चषकात भारतीय संघाने बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं आशिया कपमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेतला आहे. शनिवारी (20 जानेवारी) ब्लोमफॉन्टेन येथे खेळल्या गेलेल्या गट-अ सामन्यात भारतीय संघानं बांगलादेशचा 84 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताने सात गड्यांच्या मोबदल्यात 251 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात, बांगलादेशचा संघ 45.5 षटकांत 167 धावांवर गारद झाला. 76 धावांची खेळी करणारा आदर्श सिंग प्लेअर ऑफ द मॅच ठरला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. भारतानं 31 धावांवर दोन गडी गमावले. यानंतर सलामीवीर आदर्श सिंग आणि कर्णधार उदय सहारन यांनी मिळून भारताचा डाव सांभाळला. दोघांनी तिसर्या विकेटसाठी 23.5 षटकांत 116 धावांची भागीदारी केली. आदर्शनं 96 चेंडूत 6 चौकारांसह 76 धावा केल्या. सहारननं 94 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 64 धावांचं योगदान दिले.
भारतीय संघाचा फिनिशर सचिन धसनं डेथ ओव्हर्समध्ये चांगली फलंदाजी केली आणि 20 चेंडूत 26 धावा केल्या. या खेळीसह संघ 250 धावांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला. बांगलादेशकडून डावखुरा वेगवान गोलंदाज मारूफ मृधानं 43 धावांत 5 बळी घेतले. बांगलादेशच्या संघानं 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुरुवातीपासूनच विकेट गमावल्या. केवळ मोहम्मद सिहाब जेम्स आणि अरिफुल इस्लाम यांना काही काळ संघर्ष करता आला. सिहाबनं 54 धावांची तर अरफुलने 41 धावांची खेळी खेळली. भारताकडून सौमी पांडेने 24 धावांत 4, तर मुशीर खानने 2 बळी घेतले.
पराभवाचा बदला घेतला या विजयासह भारतीय संघाने 19 वर्षाखालील आशिया कपमध्ये बांगलादेशकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. भारत 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाला झाला. त्या सामन्यात बांगलादेशने भारतीय संघाचा चार गडी राखून पराभव केला होता. आता भारताच पुढील सामना 25 जानेवारीला रोजी आयर्लंडशी होणार आहे.
