टी-20 विश्वचषक स्पर्धा ; भारत जेतेपदाचा दावेदार

माजी प्रशिक्षण रवी शास्त्री यांना विश्वास


| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |


भारतीय संघ 2024 च्या टी-20 विश्वचषकात जेतेपदाचा मोठा दावेदार असून, चॅम्पियन बनण्यासाठी या संघाला बाद फेरीचे अखेरचे दोन सामने जिंकावेच लागतील, असे मत माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सोमवारी व्यक्त केले. भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकात 45 दिवस शानदार कामगिरीसह सलग दहा सामने जिंकले. पण, अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून एकतर्फी पराभव झाल्यामुळे जेतेपदाने हुलकावणी दिली. एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर शास्त्री म्हणाले, कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. महान खेळाडू सचिन तेंडुलकरलाही विश्वचषक जिंकण्यासाठी सहा विश्वचषकांची वाट पाहावी लागली. तुम्ही विश्वचषक सहजपणे जिंकत नाही, विश्वचषक जिंकण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागते. त्यासाठी अंतिम सामन्यात चांगली कामगिरी करायची असते.

ते म्हणाले, तुम्ही एकदा अंतिम फेरीत पोहोचलात की, तुम्ही या स्पर्धेत आधी काय केले आहे याचा काही फरक पडत नाही. एकदा तुम्ही सुरुवातीचा अडथळा पार केला की, फक्त चारच संघ असतात आणि तुम्हाला शेवटच्या दोन सामन्यांत चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. त्या दोन सामन्यांमध्ये तुमची कामगिरी चांगली असेल तर तुम्ही चॅम्पियन बनू शकता. ऑस्ट्रेलियानेही तेच केले, आणि ते चॅम्पियन बनले. त्यांनी त्यांचे पहिले दोन सामने गमावले, पण जेव्हा त्यांना चांगली कामगिरी करण्याची गरज होती, तेव्हा ती केली.

आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाकडे अनेक युवा खेळाडू आहेत. टी-20 विश्वचषकाचे आयोजन 4 जून 2024 पासून अमेरिका आणि वेस्ट इंडीज संयुक्तपणे करणार आहेत. या स्पर्धेत भारत बलाढ्य आव्हान सादर करू शकतो. मुख्य खेळाडूंची ओळख पटली आहेच, आता तुमचे लक्ष्य केवळ झटपट प्रकारावरच केंद्रित असायला हवे, असा सल्ला शास्त्री यांनी दिला आहे.,

एकदिवसीय विश्वचषक जिंकणे इतके सोपे नाही. कारण, तुम्हाला संघाची पुनर्बांधणी करावी लागेल, परंतु टी-20 मध्ये सध्या चांगला संघ आहे. विश्वचषक खेळू शकणारे अनेक नामवंत खेळाडू याआधीच पुढे आले आहेत.

रवी शास्त्री
Exit mobile version