ईसीबीने निवडली स्विंग माऱ्यास पोषक ठिकाणे
| लंडन | वृत्तसंस्था |
भारतीय पुरुष क्रिकेट संघ पुढील जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेची सुरुवात इंग्लंड दौऱ्यापासून करणार आहे. पाच कसोटी सामन्यांचा समावेश असलेल्या या मालिकेला पुढील वर्षी 20 जून 2025 पासून हेडिंग्ले येथून सुरुवात होईल. विशेष म्हणजे, या मालिकेसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डने (ईसीबी) स्विंग माऱ्यास पोषक असलेल्या ठिकाणांना पसंती दिली आहे.
भारतीय फलंदाजांची कोंडी करण्याच्या निर्धाराने ईसीबीने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना फायदेशीर ठरेल, अशा मैदानांची या मालिकेसाठी निवड केली आहे. मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथे रंगणार असून, यानंतर दुसरा कसोटी सामना 6 जुलैपासून बर्मिंगहॅम येथील एजबेस्टन मैदानावर होईल. त्यानंतर तिसरा सामना लॉर्ड्स, चौथा सामना मँचेस्टर आणि पाचवा सामना ओव्हल येथे खेळविण्यात येईल. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये एक आठवड्याची विश्रांती आहे. तिसऱ्या व चौथ्या कसोटीदरम्यान आठ दिवसांची विश्रांती आहे.
भारत एकूण 6 कसोटी खेळेल
जागतिक कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचे चालू सत्र पुढील वर्षी समाप्त होणार आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी नेहमीप्रमाणे इंग्लंडमध्ये पार पडणार आहे. जर भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम सामना गाठण्यात यशस्वी ठरला, तर भारताला इंग्लंडमध्ये एकूण 6 कसोटी सामने खेळावे लागतील. कारण, या अंतिम फेरीनंतर लगेच भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होईल.