। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारने पाठपुरावा करीत आहेत. मागण्यांवर चर्चा करून सकारात्मक निर्णय व्हावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु सरकारकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही, असा आरोप करीत जिल्हा परिषद कर्मचार्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्यावतीने हा लढा पुकारला आहे. या लढ्यात रायगड जिल्हा परिषद कर्मचारी देखील सहभागी होणार असून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती युनियनच्या जिल्हा शाखेकडून देण्यात आली आहे.
शासकिय कर्मचार्यांना जूनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु जिल्हा परिषद कर्मचार्यांना सहा महिने होऊनदेखील ग्रामविकास विभागाने हा निर्णय घेतला नाही. त्यामुळे जूनी पेन्शन योजना तातडीने लागू करावी. प्रतिक्षा यादीतील सर्व अर्जदारांना, अनुकंप तत्वावरील नोकरीत सामावून घेण्यात यावे. चतुर्थ श्रेणी व वाहनचालक पदांवरील भरती बंदी त्वरित उठवून सेवा भरती नियम अंतिम स्वरुपात प्रसिध्द करावी. चतूर्थ श्रेणी कर्मचार्यांच्या पाल्यास वारसा हक्काने नियुक्ती द्यावी. कंत्राटी कर्मचार्यांच्या सेवा नियमीत कराव्यात, अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. अनेक वेळा आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. फक्त सरकारकडून आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप कर्मचार्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या 29 ऑगस्टपासून बेमूदत संपावर जाण्याचा निर्णय या कर्मचार्यांनी घेतला आहे.