आशिया चषक उद्धाटन सोहळ्याला भारत जाणार

राजीव शुक्ला, रॉजर बिन्नींची उपस्थिती

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या निमंत्रणावरून लाहोरला भेट देणार आहेत. दोघांनी पीसीबीचे आशिया चषक स्पर्धेचे निमंत्रण स्वीकारले आहे. हे दोन्ही अधिकारी 4 ते 7 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आशिया चषकाच्या सामन्यांना उपस्थित राहणार आहेत. पीसीबीने सचिव जय शाह यांच्यासह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. बीसीसीआयने केवळ अध्यक्ष बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनाच पाकिस्तानला जाण्याची परवानगी दिल्याचे समजते. आशिया चषकाचा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात 30 ऑगस्ट रोजी मुलतान येथे होणार आहे.

बिन्नी आणि शुक्ला यांच्याशिवाय बीसीसीआयचे सचिव जय शाह 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील पल्लेकेले येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हे तिघेही 3 सप्टेंबरला भारतात परतणार आहेत. येथून राजीव शुक्ला बिन्नीसोबत वाघा बॉर्डरमार्गे लाहोरला जाणार आहेत. राजीव शुक्ला देखील 2004 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली गेलेल्या संघासोबत पाकिस्तानला गेले होते. बिन्नी आणि शुक्ला या दोघांना पीसीबीने 4 सप्टेंबर रोजी लाहोरमध्ये आयोजित केलेल्या अधिकृत डिनरसाठी आमंत्रित केले आहे. बीसीसीआयचे दोन्ही पदाधिकारी 4 सप्टेंबरला अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना आणि दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचा सुपर फोर सामना पाहणार असल्याचे समजते.

पाकिस्तानमध्ये चार आणि श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. भारत अ गटात आहे. पाकिस्तान आणि नेपाळही त्याच्यासोबत आहेत. त्याचबरोबर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-4 फेरीत प्रवेश करतील. तेथून दोन संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

Exit mobile version