भारताचा मोरोक्कोवर विजय

बोपण्णाचा मोरोक्को संघावर 4-1 असा विजय

| लखनौ | वृत्तसंस्था |

भारताच्या टेनिस संघाने रविवारी मोरोक्को संघावर 4-1 असा विजय साकारला. भारताचा 43 वर्षीय अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णाने डेव्हिस टेनिस करंडकातील अखेरच्या लढतीत यश संपादन करीत शेवट गोड केला. भारत-मोरोक्को यांच्यामध्ये डेव्हिस टेनिस करंडक जागतिक गट दोन या अंतर्गत लखनौ येथे लढत पार पडली. आता भारत जागतिक गट एक प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे.

भारत-मोरोक्को यांच्यामधील लढतीच्या पहिल्या दोन एकेरीच्या लढती शनिवारी पार पडल्या. मुकुंद शशीकुमार याला सलामीच्या लढतीत दलिमी यासिन याच्याकडून हार सहन करावी लागली. मात्र त्यानंतर सुमित नागल याने भारतासाठी झोकात पुनरागमन केले. त्याने ॲडम माऊंडिर याच्यावर 6-3, 6-3 असा विजय मिळवत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.

भारतातील टेनिसप्रेमींच्या नजरा रोहन बोपण्णाच्या लढतीवर खिळल्या होत्या. रोहनसोबत दुहेरीच्या लढतीत युकी भांब्री सहभागी झाला. रोहन-युकी यांच्यासमोर मोरोक्कोच्या इलियट बेनचेतरीत-युनेस ललामी या जोडीचे आव्हान उभे ठाकले, पण भारतीय जोडीसमोर मोरोक्कोच्या जोडीचा निभाव लागला नाही. रोहन-युकी जोडीने 6-2, 6-1 अशी बाजी मारली. प्रतिस्पर्ध्यांवर एक तास व 11 मिनिटांमध्ये विजय संपादन केला आणि भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

एकेरीच्या लढतीतही यश
भारताने अखेरच्या परतीच्या एकेरीच्या लढतीतही यश मिळवले. सुमित नागल याने दलिमीन यासिन याच्याविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत सरस कामगिरी केली. सुमित याने प्रतिस्पर्ध्यावर 6-3, 6-3 अशी एक तास व 43 मिनिटांत मात केली. त्यानंतर अखेरच्या एकेरीच्या लढतीत दिग्विजय प्रताप सिंग याने वालिद अहाऊदा याचे कडवे आव्हान 6-1, 5-7, 10-6 असे परतवून लावले. या विजयासह भारताने 4-1 अशी मोठ्या यशाला गवसणी घातली.
Exit mobile version