पाकिस्तानचा शूटआउटमध्ये पराभव
| ओमान | प्रतिनिधी |
आशिया चषक 2023 मध्ये शनिवारी खेळल्या गेलेल्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निकाल लागला नसेल, परंतु हॉकीच्या मैदानावर भारताने पाकिस्तानचा पराभव करून पुरुष हॉकी फाईव्ह्ज आशिया चषक विजेतेपद पटकावले. ओमानमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा शूटआऊटमध्ये 2-0 असा पराभव केला. यासह टीम इंडियाने एफआयएच पुरुष हॉकी फाईव्ह्ज विश्वचषक 2024 मध्येही प्रवेश केला. पाकिस्तानवरच्या या दणदणीत विजयानंतर हॉकी इंडियाने भारतीय क्रिकेट संघाला संदेश दिला आहे. हॉकी इंडियाच्या ट्विटर हँडलवरून एका ट्विटद्वारे असे म्हटले आहे की, ‘आम्ही चषक जिंकला आहे आणि आता आम्ही आशिया कप जिंकण्याची वाट पाहत आहोत. जेणेकरून विजयाचा आनंद द्विगुणित करता येईल.’
निर्धारित वेळेत सामना 4-4 असा बरोबरीत सुटला. यानंतर शूटआऊट फेरी घेण्यात आली, ज्यामध्ये भारताने पाकिस्तानचा 2-0 असा पराभव केला. भारताकडून गुरजोत सिंग आणि मनिंदर सिंग यांनी शूटआऊटमध्ये गोल केले. त्याचबरोबर निर्धारित वेळेत भारतासाठी मोहम्मद राहिल (19व्या आणि 26व्या), जुगराज सिंग (सातव्या) आणि मनिंदर सिंग (10व्या) मिनिटाला गोल केले. पाकिस्तानकडून अब्दुल रहमान (पाचव्या), कर्णधार अब्दुल राणा (13व्या), झिकारिया हयात (14व्या) आणि अर्शद लियाकत (19वा) मिनिटाला गोल केले.
अर्धा सामना होईपर्यंत पाकिस्तानचा संघ आघाडीवर होता. त्यानंतर मात्र भारतीय संघाने लौकिकाला साजेशी खेळी करत दमदार पुनरागमन केल. डावाच्या शेवटपर्यंत पाकिस्तानशी बरोबरी साधत राहिला. गोलकीपर सूरज करकेरा याने पाकिस्तानकडून केले गेलेले दोन गोल रोखले. या विजयानंतर भारताने एफआयएच पुरुष हॉकी फाइव्ज वर्ल्डकप 2024 मध्ये प्रवेश केला. याआधी भारतीय संघाने उपांत्य सामन्यात मलेशियाचा 10-4 अशा गुणफरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.