विश्वचषकात भारतीय गोलंदाजांचा दबदबा

पहिल्यांदाच बळींच्या शतकाची संधी

| मुंबई | वृत्तसंस्था |

यंदाच्या विश्वचषकात यजमान भारताच्या गोलंदाजांना आपला दबदबा निर्माण करता आला. स्पर्धेतील सर्वाधिक फलंदाजांची बळी घेणाऱ्या पाच गोलंदाजांमध्ये भारताचे दोघे आहेत. यात मोहमद शमी पहिल्या आणि जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानावर आहे. या स्पर्धेत 5 भारतीय गोलंदाजांनी दहा पेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. यामुळेच भारताला स्पर्धेत आपली विजयी मोहीम कायम ठेवताना विश्वचषकातील अंतिम सामन्याचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला.

गत उपविजेत्या न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात शानदार गोलंदाजी करत शमीने यजमान भारताला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून दिले. त्याची यादरम्यानची कामगिरी कौतुकास्पद ठरली. यामुळे संघाला घरच्या मैदानावरील स्पर्धेत विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवण्याचा आपला दावा मजबूत करता आला. आता याच दावेदारीला सिद्ध करण्यासाठी भारतीय संघ रविवारी अहमदाबादच्या मैदानावर उतरणार आहे. भारताच्या गोलंदाजीच्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. भाताच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांचा 10 पैकी 8 वेळा खुर्दा उडवला आहे. अशा प्रकारे भारतीय संघाने यंदाच्या विश्वचषकात 96 फलंदाज बाद केले आहेत. ही भारताची आतापर्यंतच्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. यापूर्वी 2003 विश्वचषकात भारताने 11 सामन्यांत 86 बळी घेतले होते. भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे आठ गडी बाद केल्यानंतर विश्वचषकात विक्रमी बळींचा पल्ला गाठता येणार आहे.

मोहंमद सिराज: नवीन चेंडूच्या स्विंगने प्रतिस्पर्धी संघांच्या अव्वल फलंदाजांना अडचणीत आणण्यात सिराज तरबेज आहे. तो 13 बळी घेत आघाडीवर आहे. त्याने 8 डावांत किमान एक फलंदाज बाद केला आहे. तो प्रत्येक 33 धावांनंतर व 35 व्या चेंडूवर एक फलंदाज बाद करीत आहे.
कुलदीप यादव: 10 डावांत 15 फलंदाज बाद करणारा कुलदीप यादव हा जडेजासाठी अप्रतिम जोडीदार ठरला आहे. कुलदीपला एका डावात 2 पेक्षा जास्त बळी घेता आले नाहीत. मात्र, 10 पैकी 9 डावांत त्याला किमान एक गडी बाद करता आला आहे. त्याचा इकॉनॉमी रेट 4.32 असा आहे.
रवींद्र जडेजा: सामन्यांच्या मधल्या षटकांमध्ये रवींद्र जडेजाने आपली महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्याच्या नावे 10 डावांत 16 फलंदाज बाद केल्याची नोंद आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 फलंदाज बाद केले आहेत. जडेजाही कडक गोलंदाजी करत प्रतिषटकात फक्त 4.25 धावा देत आहे.
मोहम्मद शमी: सध्या प्रत्येक 11 व्या चेंडूवर फलंदाज बाद करीत आहे. त्याने प्रत्येक फलंदाज बाद करण्यासाठी 9.13 धावा खर्च केल्या आहेत. एका विश्वचषकात 20 पेक्षा अधिक फलंदाज बाद करणाऱ्या गोलंदाजाचा हा सर्वोत्तम सरासरी आणि स्ट्राइक रेट आहे. शमी 6 डावांत 23 फलंदाज बाद करून अव्वल गोलंदाज आहे. शमीने तीन डावांत पाच पेक्षा अधिक फलंदाजांचे बळी आणि एका डावात चार पेक्षा अधिक फलंदाज बाद केले आहेत. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यामध्ये महत्वाच्या सात फलंदाजांना तंबूत धाडले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात 5 बळी घेतल्यास शमी हा यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक फलंदाज बाद करण्याचा विक्रम करेल. गत विश्वचषकात स्टार्कने सर्वाधिक 27 फलंदाज बाद केले होते.
जसप्रीत बुमराह: 10 डावांत 18 फलंदाज बाद करीत बुमराह पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. प्रत्येक 28 व्या चेंडूवर तो बळी घेत आहे. यासाठी तो 18 धावा देताना दिसतो. दमदार गोलंदाजी ही त्याची खास शैली आहे. तो प्रतिषटक फक्त 3.98 धावा देत आहे.
Exit mobile version