| पणजी | प्रतिनिधी |
जगज्जेता भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश याचे फिडे विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. शनिवारी दुसऱ्या डावात त्याला फ्रेडरिक स्वेन याने पराभूत केले, त्यामुळे गुकेशला जागतिक अजिंक्यपदानंतर विश्वकरंडक जिंकणे शक्य झाले नाही. अर्जुन एरिगैसी, आर. प्रज्ञानंद, पी. हरिकृष्ण व जागतिक ज्युनियर विजेता व्ही. प्रणव यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. ही स्पर्धा उत्तर गोव्यातील हडफफडे येथे सुरू आहे.
यावेळी फ्रेडरिक याने तिसऱ्या फेरीतील पहिल्या डावात शुक्रवारी गुकेशला बरोबरीत रोखले होते. शनिवारी 21 वर्षीय जर्मन ग्रँडमास्टरने वेळेच्या बंधनातून बाहेर पडत विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या गुकेशला कोंडीत पकडले. अखेर 19 वर्षीय जगज्जेत्यास माघार घेत पराभव मान्य करावा लागला. फ्रेडरिक याने 1.5-0.5 गुणफरकाने पुढील फेरी गाठली. तसेच, ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने आगेकूच राखताना आर्मेनियन ग्रँडमास्टर रॉबर्ट होव्हान्निसियान याला 1.5-05 असे हरविले. दुसऱ्या डावात प्रज्ञानंद विजयी ठरला. आर्मेनियन खेळाडूने 42 चालीअंती पराभव मान्य केला. पी. हरिकृष्ण याने बेल्जियमचा ग्रँडमास्टर डॅनियल दार्धा याला नमविले. पहिला डाव जिंकणाऱ्या हरिकृष्ण याने दुसऱ्या डावात झटपट बरोबरीस पसंती दिली.
भारतीय बुद्धिबळपटूंत अव्वल असलेल्या अर्जुन एरिगैसी याने स्पर्धेतील सलग तीन विजयानंतर बरोबरी साधत चौथी फेरी गाठली. तिसऱ्या फेरीतील पहिल्या डावात पूर्ण गुण प्राप्त केलेल्या अर्जुन याने दुसऱ्या डावात उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर शम्सीद्दीन वोखिदोव याच्याविरुद्ध बरोबरीस पसंती दिली. प्रणव यानेही पहिल्या डावातील विजयानंतर ग्रँडमास्टर टिटास स्ट्रेमाव्हिसियस याच्याविरुद्ध दुसऱ्या डावातील बरोबरीसह आगेकूच राखली. तिसऱ्या फेरीतील अन्य भारतीय खेळाडूंत दोन्ही डाव बरोबरीत राहिल्यामुळे विदित गुजराथी, कार्तिक व्यंकटरमण, एस. नारायणन यांना रविवारी टायब्रेक फेरीत खेळावे लागेल. दिप्तयान घोष याचे आव्हान संपुष्टात आले.






