| चेंगडू (चीन) | वृत्तसंस्था |
भारतीय पुरुष संघाला थॉमस करंडक या प्रतिष्ठेच्या बॅडमिंटन स्पर्धेमधील ‘क’ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. इंडोनेशियाने भारतीय संघावर 4-1 असा विजय मिळवला. या विजयामुळे क गटामध्ये इंडोनेशियाने पहिल्या स्थानावर झेप घेतली. भारतीय संघ दुसर्या स्थानावर राहिला. इंडोनेशिया व भारत या दोन देशांनी क गटामधून बाद फेरीत प्रवेश केला होता. या गटातील थायलंड व इंग्लंड या दोन देशांचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते. त्यामुळे या गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत पहिल्या व दुसर्या स्थानासाठी चुरस होती. इंडोनेशिया – भारत यांच्यामधील लढतीतील विजेता पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरणार होता. त्यामुळे या लढतीच्या निकालावर विशेष लक्ष होते.
भारताच्या एच. एस. प्रणोय याने अँथोनी गिनटिंग याचा कडवा संघर्ष 13-21, 21-12, 21-12 असा तीन गेममध्ये मोडून काढला. प्रणोय याने ही लढत एक तास व एक मिनिटात जिंकली व भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मात्र भारतीय खेळाडूंना इंडोनेशियाच्या खेळाडूंचे आव्हान परतवून लावता आले नाही. सात्विक साईराज रंकीरेड्डी – चिराग शेट्टी या दुहेरीतील जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण मुहम्मद फिकरी – बगार मौलाना या जोडीने सात्विक – चिराग या भारतीय जोडीवर 24-22, 22-24, 21-19 अशी तीन गेममध्ये मात केली. भारतीय जोडीचा एक तास व सतरा मिनिटांमध्ये पराभव झाला. महत्त्वाच्या लढतीत लक्ष्यची हार इंडोनेशियाने 1-1 अशी बरोबरी केल्यानंतर लक्ष्य सेनवर भारताची मदार होती. परतीच्या एकेरीच्या लढतीत त्याच्याकडून भारताला विजय हवा होता. पण जॉनाथन ख्रिस्तीने लक्ष्यवर 21-18, 16-21, 21-17 अशी मात केली. लक्ष्यला एक तास व पंधरा मिनिटांत हार पत्करावी लागली. इंडोनेशियाने 2-1 अशी आघाडी मिळवली. ध्रुव कपिला – साई प्रतीक या जोडीला दुहेरीच्या लढतीत निराशेचा सामना करावा लागला. त्यामुळे इंडोनेशियाला 3-1 अशी विजयी आघाडी घेता आली.
अखेरच्या लढतीत श्रीकांतकडून निराशा दोन देशांमधील अखेरच्या लढतीत किदांबी श्रीकांतकडून निराशा झाली. पहिला गेम त्याने 21-19 असा जिंकला. दुसर्या गेममध्येही त्याने चिको वारडोयो या इंडोनेशियाच्या खेळाडूला झुंज दिली. पण दबावाखाली चिको याने आपला खेळ उंचावला व 24-22 असा हा गेम जिंकत बरोबरी साधली. चिको याने अखेरच्या गेममध्ये यश मिळवत इंडोनेशियाला चौथा विजय मिळवून दिला.