‘इंडियन पिट्टा’ पक्षी कर्नाळा परिसरात दाखल

पावसाच्या चाहुलीने निसर्गप्रेमींमध्ये उत्साह

। पनवेल । प्रतिनिधी ।

मान्सूनपूर्व काळात पावसाचे संकेत देणारा प्रसिद्ध ‘इंडियन पिट्टा’ पक्षी कर्नाळा परिसरात दाखल झाला असून, निसर्गप्रेमी आणि पक्षी अभ्यासकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. रंगीबेरंगी पिसे आणि मधुर आवाजासाठी ओळखला जाणारा हा पक्षी दरवर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस कर्नाळा जंगल परिसरात दिसून येतो. यंदाही त्याचे आगमन झाल्याने पावसाची चाहूल लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पक्षी अभ्यासक व निरीक्षक माधव आठवले तसेच पक्षी अभ्यासक समाधान पवार यांनी कर्नाळा परिसरात इंडियन पिट्टाचे निरीक्षण केले असून, गेल्या काही दिवसांपासून पहाटे व संध्याकाळच्या वेळेत त्याचा आवाज ऐकू येत असल्याची माहिती दिली. जंगलातील ओलसर भाग, झाडाझुडपे आणि पानगळ झालेल्या परिसरात हा पक्षी प्रामुख्याने अन्न शोधताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

हिरवा, निळा, पिवळा आणि तपकिरी रंगांच्या मिश्रणामुळे इंडियन पिट्टा हा पक्षी पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. कर्नाळा अभयारण्यात येणारे पक्षीप्रेमी या पक्ष्याचे छायाचित्र टिपण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान, जंगल परिसरात शांतता राखावी, प्लास्टिक व कचरा टाकू नये तसेच पक्ष्यांच्या अधिवासाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पक्षी अभ्यासक माधव आठवले यांनी केले आहे. पक्षी निरीक्षक समाधान पवार नेहमी या परिसरातील विविध पक्षी चा सखोल अभ्यास करत असतात त्याचे अस्तित्व कसे जपले जाईल त्याची काळजी घेतात.

Exit mobile version