। पनवेल । प्रतिनिधी ।
पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच ‘भारतीय पिट्टा’ कर्नाळा अभयारण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
भारतीय पिट्टा हा पक्षी खास श्रीलंकेतून येत असतो. हिवाळ्यात पुन्हा तो आपल्या परतीच्या प्रवासाला निघतो. भारतीय पिट्टा कोकण परिसरात मोठ्या प्रमाणावर दिसत असून, सध्या तो पनवेल जवळील कर्नाळा अभयारण्यात दाखल झाला आहे. हा पक्षी लहान आकाराचा असून तो आपल्या रंगासाठी ओळखला जातो. त्याच्या अंगावर असणार्या नवरंगांमुळे तो खुलून दिसतो. त्याचे पाय लांब आणि मजबूत असून, चोच जाड असते. हा पक्षी दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर आणि पालापाचोळ्यामधील कीटक शोधताना दिसतो. यामधील नर आणि मादी हे एकसारखेच दिसतात. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पक्षाचे आगमन झाल्याने पक्षी निरीक्षकांना आनंद झाला आहे. त्याचे छायाचित्र टिपण्या करता अनेक छायाचित्रकार याठिकाणी येत असतात.