। सुकेळी । वार्ताहर ।
संपुर्ण रायगड जिल्ह्याला अक्षरशः अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. रोहा तालुक्यासह नागोठणे परिसरामध्ये मंगळवारी (दि.6) अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. त्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता जाणवत होती. आकाशात पुर्णतः ढग भरुन आले होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास नागोठणे परिसरामध्ये अचानक विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. त्यामध्ये लग्न मंडपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर या अवकाळी पावसाचा आंबा, काजू, बागायतदार शेतकर्यांसह वीटभट्टी व्यावसायीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, गूरांसाठी साठवुन ठेवण्यात आलेला चारा देखील भिजला आहे. त्याचप्रमाणे काढणीसाठी झालेल्या आंब्यांवर अवकाळी धडकल्यामुळे पीक खराब होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकर्यांना पडली आहे.