भारतीय रिले संघ अंतिम फेरीत

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताच्या पुरुषांच्या 4400 रिले संघाने जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरून इतिहास रचला आहे. शनिवारी भारतीय संघ प्रथमच अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरला. भारतीय संघाने 2 मिनिटे 59.05 सेकंदात शर्यत पूर्ण केली, जी कोणत्याही आशियाई संघापेक्षा जास्त होती. भारताच्या संघात मोहम्मद अजमल, राजेश रमेश, अमोज जेकब आणि मोहम्मद अनस याहिया यांचा समावेश होता.

भारताने दुसरे स्थान मिळवून प्रथमच पात्रता मिळवली आहे. फक्त अमेरिकेचा संघ भारताच्या पुढे होता. अमेरिकेच्या रिले संघाने 2 मिनिटे 58.47 सेकंदात शर्यत पूर्ण केली. आणि आता अंतिम सामना रविवारी होणार आहे. या शर्यतीसह भारताचा रिले संघ आशियातील सर्वोत्तम संघ ठरला आहे.

भारतापूर्वी, आशियाई संघांमध्ये सर्वात वेगवान रिले संघाचा विक्रम जपानच्या नावावर होता, ज्याने 2 मिनिटे 59.51 सेकंदात शर्यत पूर्ण केली. यापूर्वी, भारताचा विक्रम 3 मिनिटे 00.25 सेकंदांचा होता, जो 2020 ऑलिम्पिकमध्ये त्याच भारतीय संघाने (मोहम्मद अजमल, राजेश रमेश, अमोज जेकब आणि मोहम्मद अनस याहिया) केला होता. त्यानंतर भारतीय संघ अंतिम फेरीला मुकला होता.

या रिले शर्यतीत भारताकडून संथ सुरुवात झाली होती. मोहम्मद अनस याहियाने संघाला संथ सुरुवात करून दिली. पहिल्या फेरीनंतर भारत सहाव्या क्रमांकावर होता. यानंतर अमोज जेकबने संघाचा वेग वाढवला आणि भारताला दुसऱ्या स्थानावर नेले. यानंतर मोहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांनी आपल्या उत्कृष्ट वेगाच्या जोरावर शेवटच्या दोन टप्प्यात भारताला अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. अशाप्रकारे इतिहास रचत भारतीय रिले संघाने प्रथमच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

Exit mobile version