भारतीय खेळाडूंचा परदेशात डंका

27 पदकांसह सर्वोत्तम कामगिरी

| बँकॉक | वृत्तसंस्था |

पुरुषांच्या 4-400 मीटर रिले शर्यतीत भारतीय संघाने रौप्यपदकाची कमाई केली आणि एकूण 27 पदके (6 सुवर्ण, 12 रौप्य, 9 कांस्य) जिंकून आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली. परदेशात झालेल्या स्पर्धेत मात्र भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी यजमानपद भूषविताना 2017 च्या भुवनेश्‍वर येथील स्पर्धेत भारताने नऊ सुवर्णपदकांसह 27 पदके जिंकली होती. भारताबाहेर म्हणजे 1985 च्या जकार्ता स्पर्धेत भारताने 10 सुवर्णांसह 22 पदके जिंकली होती. दरम्यान, शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 13 पदके जिंकली. जपानने 37 पदकांसह प्रथम, चीनने 22 पदकांसह दुसरे स्थान मिळविले. मात्र, चीनने भारतापेक्षा दोन सुवर्णपदके अधिक मिळवली. भारताने आज महिलांच्या गोळाफेक व 20 किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पदक जिंकले.

विकास सिंग आणि प्रियांका यांनी 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत सकाळी भारताचे पदकाचे खाते उघडले. विकासने 1 तास 29 मिनिटे 33 सेकंदात ब्राँझ, तर प्रियांकाने 1 तास 34 मिनिटे 24 सेकंदात रौप्यपदक जिंकले. पुरुषांच्या शर्यतीत 1991 च्या स्पर्धेत सुचा सिंग यांनी भारतासाठी शेवटचे ब्राँझपदक जिंकले होते. त्यानंतर विकासने ही कामगिरी केली. महिलांच्या शर्यतीत भारताला प्रथमच पदक जिंकता आले. 800 मीटरच्या दोन्ही शर्यतीतही भारतीय धावपटूंनी पदक जिंकण्याची किमया केली. पुरुषांत हरियानाच्या क्रिशन कुमारने 1 मिनिट 45.88 सेकंद, तर महिलांत दिल्लीच्या के. एम. चंदाने 2 मिनिटे 01.58 सेकंद वेळ देत रौप्य जिंकले. टिंटू लुकानंतर चंदाने भारताला आठ वर्षांनंतर पदक मिळवून दिले. गुलवीर सिंगने पाच हजार मीटर शर्यतीत ब्राँझपदक जिंकून लांब पल्ल्याच्या शर्यतीतील भारताची गौरवशाली परंपरा कायम राखली. अंकिताला 16 मिनिटे 03.33 सेकंदात ब्राँझपदक मिळाले. 2019 च्या स्पर्धेत पारुलने ब्राँझपदक जिंकले होते. 100 मीटर हर्डल्स शर्यतीत भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळवून देणार्‍या ज्योती यराजीला 200 मीटर शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने 23.13 सेकंद अशी मोसमातील सर्वोत्तम वेळ दिली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऐश्‍वर्या मिश्राने 400 मीटरमध्ये ब्राँझ, मिश्र रिलेत सुवर्ण व 4-400 रिलेत ब्राँझ अशा तीन पदकांची कमाई केली.

पारुल, ज्योतीचे दुसरे पदक
पारुल चौधरी व ज्योती यराजी यांनी आज स्पर्धेतील आपले दुसरे पदक जिंकले. तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत सुवर्णपदक जिंकणार्‍या पारुल चौधरीने पाच हजार मीटर शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिने 15 मिनिटे 52.35 सेकंद अशी वेळ दिली.

आभा खटुआला रौप्य
महाराष्ट्राची असलेल्या आभा खटुआने गोळाफेकीत चौथ्या प्रयत्नात 18.06 मीटर अंतरावर गोळा फेकला आणि रौप्यपदक निश्‍चित केले. या कामगिरीमुळे स्पर्धेच्या इतिहासात महिला गोळाफेकीत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. डोपिंगची शिक्षा भोगून पुनरागमन करणार्‍या मनप्रीत कौरने 17 मीटर कामगिरीसह कांस्यपदक जिंकले.

Exit mobile version