। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा आता करण्यात आली आहे. अजित आगरकर यांच्या निवड समितीने रोहित शर्मावर विश्वास कायम ठेवला असून त्याच्याकडेच कर्णधारपद ठेवले आहे. त्याचबरोबर काही धक्कादायक निर्णय यावेळी भारताच्या निवड समितीने घेतले आहेत. हार्दिक पंड्याची टी-20 विश्वचषकासाठी निवड होणार का, याची जोरदार चर्चा होती. या चर्चेला आता निवड समितीने पूर्ण विराम दिला आहे. हार्दिककडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
आयपीएल संपल्यावर लगेचंच टी-20 विश्वचषकाच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. येत्या १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे टी-20 चे सामन्यांचे आयोजन होत आहे. या संदर्भात राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यात अनौपचारिक बैठक झाली होती. या बैठकीनंतर भारताचा संघ जाहीर करण्यात आला. रोहित शर्मा, राहुल द्रविड आणि अजित आगरकर यांच्यात काही नावांवर एकमत झाले नव्हते. आयसीआयने संघ जाहीर करण्यासाठी 1 मेपर्यंतची वेळ दिली होती. त्यामुळे शनिवारी झालेल्या मुंबईविरूद्ध दिल्लीच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत संवाद साधण्यासाठी आगरकर थेट दिल्लीला पोहोचले होते.
भारताचा टी-20 विश्वचषकासाठीचा संघ रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
आयपीएलमध्ये विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान पटवण्यासाठी शर्यत सुरू होती. ऋषभ पंतने संघातील यष्टीरक्षकाची जागा जवळपास निश्चित केली आहे. दुसऱ्या जागेसाठी के. एल. राहुलच्या नावाची चर्चा होती. संघातील काही जागांवर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यातील सर्वात पहिले नाव म्हणजे हार्दिक पंड्या होते. आयपीएलमधील अपयशी कामगिरी नंतरही हार्दिक संघात बसू शकतो, याचे कारण असे की भारताकडे अष्टपैलूचे साजेसे पर्याय नाहीत. शिवम दुबेला तिकीट मिळण्याची संधी आहे, पण त्याने अद्याप गोलंदाजीचे प्रदर्शन केले नाही. हार्दिक आणि शिवममध्ये हार्दिकची गोलंदाजी सरस म्हणावी लागेल. मात्र, फलंदाजीत शिवम नक्कीच उजवा आहे. आता कर्णधार आणि आगरकर कोणाला संधी देतील यावर चाहत्यांच्या नजरा असतील. पंरतु, हार्दिकला संघात स्थान मिळाल्यास शिवम दुबे आणि रिंकू सिंग यांच्यापैकी एकालाच स्थान दिले जाऊ शकते.