टोरांटोमध्ये भारतीय वादळः गॅरी कॅस्पारोव

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताचा 17 वर्षीय डी. गुकेश याने रविवारी आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदावर मोहर उमटवताना ऐतिहासिक कामगिरी केली. जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या गुकेशवर चोहोबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. याच पार्श्वभूमीवर रशियाचे महान बुद्धिबळपटू गॅरी कॅस्पारोव यांनीही गुकेशच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना म्हटले की, टोरांटोमध्ये भारतीय वादळ आले.

गॅरी कॅस्पारोव यांनी वयाच्या 22व्या वर्षी 1984मध्ये आव्हानवीरांची बुद्धिबळ स्पर्धा जिंकत जगज्जेतेपदासाठीच्या लढतीत ॲनातली कारपोव यांच्याशी दोन हात केले. डी. गुकेश याने यंदाच्या आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपदाचा मान संपादन केला. तोही वयाच्या 17व्या वर्षी. त्याने कॅस्पारोव यांचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. याप्रसंगी कॅस्पारोव यांनी सोशल मीडियावर गुकेशची स्तुति करताना म्हटले की, टोरांटोमध्ये डी. गुकेशच्या रूपात भारतीय वादळ आले. जागतिक बुद्धिबळाच्या पटावर नवी क्रांती घडून आली. आता जगज्जेतेपदाच्या लढतीत गुकेशसमोर चीनच्या डिंग लिरेन याचे आव्हान असेल. गुकेशचे अभिनंदन!

Exit mobile version