भारतीय संघाची केपटाऊनमध्ये ‘कसोटी’

आफ्रिकेचा नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय

। केपटाऊन । वृत्तसंस्था ।

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमध्ये सुरू होणार आहे. डीन एल्गर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने दोन बदल केले आहेत. रविचंद्रन अश्विनच्या जागी रवींद्र जडेजा आला आहे. शार्दुल ठाकूरच्या जागी मुकेश कुमारला संघात स्थान मिळाले आहे. सध्या भारतीय संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं पिछाडीवर आहे. हा सामना जिंकून मालिका अनिर्णीत राखण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

हा सामना न्यूलँड्स, केपटाऊन इथं होणार असून भारतीय संघाचा रेकॉर्ड इथे खूपच खराब राहिलेला आहे. केपटाऊनमध्ये आजपर्यंत एकही कसोटी सामना भारतीय संघाला जिंकता आलेला नाही. या मैदानावर भारतीय संघाने आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. तर, 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय संघ केपटाऊन मैदानावरील हा खराब रेकॉर्ड सुधारण्याचाही प्रयत्न करेल.

भारतीय संघानं 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका खेळण्यास सुरुवात केली. या 31 वर्षांत भारतीय संघ केपटाऊन येथील न्यूलँड्स स्टेडियमवर सहा कसोटी सामने खेळला आहे. पण एकही सामना जिंकू शकलेला नाही. 2018 आणि 2022 मध्ये इथं खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी अत्यंत खराब राहीली आहे. या दोन कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी चार डाव खेळले. परंतु, त्यांची सर्वोच्च धावसंख्या केवळ 223 धावांची होती. 2018 मध्ये त्यांनी 209 आणि 135 धावा केल्या, तर 2022 मध्ये त्यांनी 223 आणि 198 धावा केल्या. यावरून येथील परिस्थिती फलंदाजांसाठी सोपी राहणार नसल्याचं दिसून येत आहे.

तसेच, आफ्रिकेचा दिग्गज डावखुरा सलामीवीर फलंदाज डीन एल्गार आज आपल्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून त्याला विजयी निरोप देण्याचा आफ्रिकेचा प्रयत्न असेल.

भारतः रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.
द.आफ्रिका : डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जॉर्जी, ट्रीस्टन स्टर्ब, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेने (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.
Exit mobile version