भारतीय महिलांनी मालिका गमावली

इंग्लंडकडून माफक आव्हानाचा सहज पाठलाग

| मुंबई | प्रतिनिधी |

भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला 80 धावांत रोखले. त्यानंतर हे आव्हान 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 12 व्या षटकातच पार केले. इंग्लंडने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे.
मुंबईच्या वानेखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत भारताची अवस्था 5 बाद 34 धावा अशी केली होती. भारताकडून स्मृती मानधना आणि जेमिमाह रॉड्रिग्ज या दोन बॅटरच दुहेरी आकडा गाठू शकल्या.

स्मृतीने 10, तर जेमिमाहने 30 धावांचे योगदान दिले. भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताचा संपूर्ण डाव 80 धावात संपुष्टात आला. इंग्लंडकडून चार्लेट डीन, लॉरेल बेन, एकलस्टोन सारा ग्लेन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

भारताचे 80 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडने आक्रमक सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेणुका सिंह ठाकूरच्या भेदक माऱ्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या तीन षटकातच दोन गडी बाद झाले होते. मात्र, त्यानंतर एलिस कॅप्सी आणि नॅट सिव्हर ब्रंट यांनी डाव सावरत संघाचे आठव्या षटकातच अर्धशतक धावफलकावर लावले. कॅप्सीने 25, तर ब्रंटने 16 धावा केल्या. दरम्यान, दिप्ती शर्माने एमी जोन्स आणि फ्रेया कॅम्पला पाठोपाठ बाद करत इंग्लंडची अवस्था 6 बाद 73 धावा अशी केली. मात्र, सोफी एकलस्टोन आणि हेथर नाईटने विजयाची औपचारिकता 12 व्या षटकातच पूर्ण केली.

Exit mobile version