कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिलांचा डंका

फायनलमध्ये तुर्कीचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले

| दक्षिण कोरीया | वृत्‍तसंस्था |

सध्या दक्षिण कोरियामध्ये तिरंदाजी विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रनीत कौर, अदिती स्वामी आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या भारतीय महिला संघाने शनिवारी (दि.25 मे) या स्पर्धेच्या कंपाउंड स्टेज दोनच्या अंतिम फेरीत तुर्कीचा पराभव करून सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले.

भारतीय त्रिकुटाने तुर्कीच्या हजल बुरुन, आयसे बेरा सुझर आणि बेगम युवा यांचे आवाहन सुरुवातीपासूनच मोडून काढले आणि अंतिम सामना 232-226 असा जिंकला. सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रनीत कौर, अदिती स्वामी आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी तुर्कीचे आवाहन मोडून काढले आणि एकही संधी न दवडता सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीची सुरुवात खूपच रोमांचक झाली. तिरंदाजी विश्वचषकातील भारतीय त्रिकुटाचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात भारताला आणखी दोन पदकांची आशा आहे. ज्योती सुरेखा वेण्णम आणि प्रियांश यांचा अमेरिकेतील त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी कंपाऊंड मिश्र सांघिक अंतिम फेरीत सामना होईल, तर प्रथमेश फुगेला कंपाउंड प्रकारात पदक जिंकण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. अशा स्थितीत भारताला आणखी दोन सुवर्णपदके जिंकण्याची संधी आहे.

Exit mobile version