| पॅरिस | वृत्तसंस्था |
पॅरिसमध्ये झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2023 च्या चौथ्या टप्प्यात भारतीय पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी सुवर्णपदके जिंकली. ओजस प्रवीण देवतळे, प्रथमेश जवकर आणि अभिषेक वर्मा यांचा समावेश असलेल्या भारताच्या पुरुष कंपाउंड तिरंदाजी संघाने अंतिम फेरीत यूएसएचा 236-232 असा पराभव करून अव्वल स्थान पटकावले. अदिती गोपीचंद स्वामी, ज्योती सुरेखा वेन्नम आणि परनीत कौर या महिला त्रिकुटाने चुरशीच्या अंतिम सामन्यात मेक्सिकोवर 234-233 असा विजय मिळवत सुवर्णपदक जिंकले.
अंतिम फेरीच्या मार्गावर, भारतीय पुरुष कंपाउंड संघाने 14 संघांचा समावेश असलेल्या पात्रता फेरीत 2127 गुणांची कमाई करत चौथे स्थान पटकावले. भारतीय त्रिकुटाने उपांत्यपूर्व फेरीत आणि उपांत्य फेरीत अनुक्रमे इटली आणि मेक्सिकोला पराभूत करून सुवर्णपदकाच्या लढतीत प्रवेश करण्यासाठी उपांत्य फेरीत बलाढ्य मानल्या जाणाऱ्या कोरिया संघाला पराभूत केले. भारतीय महिला कंपाऊंड संघाने पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावत 2113 गुण मिळवून सुरुवातीपासूनच स्पर्धेवर वर्चस्व राखले. पहिल्या फेरीत बाय मिळाल्याने, भारतीय त्रिकुटाने उपांत्यपूर्व फेरीत आणि उपांत्य फेरीत अनुक्रमे एस्टोनिया आणि ग्रेट ब्रिटनचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.