भारतीय महिला बॅडमिंटन संघाची विजयी सुरुवात

| चेंगडू (चीन) | वृत्तसंस्था |

शनिवारी (दि.27) एप्रिल चेंग्दू, चीन येथे सुरु झालेल्या उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या नवोदित महिला संघाने शानदार सुरुवात केली. भारतीय महिला संघाने कॅनडाचा 4-1 असा पराभव करुन दणक्यात सुरुवात केली. आसामच्या अस्मिता छलिहा आणि इशारानी बारुआ, मणिपूरच्या प्रिया कोंजेनबाम यांनी अनुभवी खेळाडू संघात नसतानाही धैर्य दाखवले, तर (17) वर्षीय अनमोल खारब आणि श्रृती मिश्रा यांनी आपली गुणवत्ता सादर केली. भारतीय संघात (24) वर्षीय अस्मिता हीच एकेरीतील अनुभवी खेळाडू आहे. तिचा सामना कॅनडाची विख्यात खेळाडू मिचेली ली हिच्याविरुद्ध झाला. या सामन्यात जागतिक क्रमवारीत 53 व्या क्रमांकावर असलेल्या अस्मिताने 25 व्या क्रमांकावर असलेल्या मिचेल लीला 26-24, 24-22 अशी मात केली.

पहिल्या गेमध्ये अस्मिता 1-6 असे पिछाडीवर पडली होती, परंतु 5-7 अशी पिछाडी भरून काढल्यानंतर 9-8 आणि 11-10 अशी आघाडी घेऊन उमेद कायम ठेवली आणि तेथून पुढे आत्मविश्‍वास उंचावत तिने मिचेलीचा प्रतिकार मोडून काढला. महिलांच्या दुहेरीत प्रीया आणि श्ृती मिश्रा आणि कॅनडाच्या जोडीवर 21-11, 21-10 अशी सहज मात करुन भारताला 2-0 आघाडी मिळवून दिली. प्रिया आणि शृती या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या आहेत. दुहेरीतील या शानदार यशानंतर तिसर्‍या एकेरीत (20) वर्षीय इशारानी हिनेही आपला ठसा उमटवला आणि वेन यू झँग हिचा 21-13, 21-13 असा पराभव करुन 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. महिलांच्या दुसर्‍या दुहेरीत मात्र भारताच्या सिमरन आणि रितिका यांना जॅकी डेंट व क्रिस्टल लाई यांच्याकडून 19-21, 15-21 अशी हार स्वीकारावी लागली. अखेरच्या एकेरीत अनमोलने जागतिक क्रमवारीत 85 व्या स्थानावर असलेल्या एलिना झँगचे आव्हान 21-15, 21-11 असे मोडून काढले आणि भारताच्या 4-1 अशा वर्चस्वावर मोहोर उमटवली.

Exit mobile version