आज संध्याकाळी होणार यशस्वी सांगता
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
एकशे वीस कोटी भारतीयांची छाती अभिमानाने भरुन यावी, अशी घटना आज बुधवारी सायंकाळी अवकाशात घडणार आहे. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान मोहिमेकडे लागून राहिलेले आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी आणि भारताचे नाव जगाच्या इतिहासात अभिमानाने चमकावे, अशी प्रार्थना समस्त भारतीय करीत आहेत.आता अवघे काही तास उरले आहेत.
भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ‘चांद्रयान-3’ हे बुधवारी (दि.23) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. संपूर्ण देशासाठी हा एक ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण असणार आहे. या क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी समस्त भारतीयांना मिळणार आहे. कारण, चांद्रयानाच्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण सर्वांना पाहता येणार आहे. बुधवारी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी उतरण्याची प्रक्रिया आणि त्याचं थेट प्रक्षेपण सुरू केलं जाणार आहे.
भारत चौथा देश चांद्रयान बुधवारी नियोजित वेळेत सुखरुप उतरले तर चंद्रावर उतरणारा भारत हा चौथा देश ठरेल. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा पहिलाच देश ठरण्याचा मान भारताला मिळणार आहे. विक्रम लँडर सध्या चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागा शोधत आहे. चंद्रावर ठिकठिकाणी खडकाळ आणि खड्डे असलेली जमीन आहे. त्यामुळे उतरण्यासाठी सपाट जमीन शोधण्याचा प्रयत्न विक्रम लँडर करत आहे. ही प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये पार पडणार आहे.
पंतप्रधान इस्त्रोमध्ये येणार या चांद्रयान मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रीहरीकोटा येथील इस्त्रोच्या मुख्य वास्तुत उपस्थित राहणार आहेत. सर्व वैज्ञानिक, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत ते भारताच्या चांद्रयानाचे थेट प्रक्षेपण पाहणार आहेत.