। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आशियाई स्पर्धेत भारतीय खेळाडूंची देदीप्यमान कामगिरी सुरुच आहे. भारतानं पहिल्यांदा आशियाई स्पर्धेत 100 आकडा गाठला आहे. भारताच्या पुरूष आणि महिला बद्धीबळ संघाने एशियन गेम्स 2023 मध्ये रौप्य पदक पटकावले. याचबरोबर भारताची एशियन गेम्समधील यंदाची ऐतिहासिक मोहीम ही 107 पदकांसह संपली.
अंतिम फेरीत भारताच्या हरिका द्रोणावली, वैशाली रमेशबाबू, वनिता अगरवाल आणि सविता श्री भास्कर यांनी आपपाले सामने जिंकून दक्षिण कोरियाचा पराभव 4-0 असा केला होता. फायनलमध्ये त्यांनी 15 मॅचपाईंट्स मिळवले. मात्र रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या चीनने युएईविरूद्धची आपली अंतिम फेरी जिंकून 18 पैकी 17 मॅच पॉईंट्स खिशात टाकले. याचबरोबर त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. यानंतर भारतीय पुरूष बुद्धीबळ संघाने फिलिपिन्सविरूद्ध 3.5 – 0.5 असा विजय मिळवला. टॉप सिडेड अर्जुन, डी गुकेश, विदित गुजराथी आणि हरिकृष्ण पेनताला यांनी त्यांचे सामने जिंकले. तर आर प्रग्यानंदाने इराणच्या बुद्धीबळपटूविरूद्ध आपला सामना ड्रॉ केला. त्यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तर इराणने सुवर्ण पदकाची कमाई केली.
या स्पर्धेत भारताला एकूण 107 पदकं मिळाली असून, यामध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य, 41 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंनी यंदा आशियाई खेळाडूंची विक्रमी कामगिरी केली असून, आतापर्यंतची आशियाई स्पर्धेतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
आशियाई स्पर्धेत भारताचे पदकांचं शतक
