जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताची अंतिम पंघाल विश्वविजेती

| अम्मान (जॉर्डन) | वृत्तसंस्था |

भारताच्या मुलींनी 20 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत दमदार कामगिरी करताना तीन सुवर्ण, तीन कांस्य आणि एक रौप्य अशा सात पदकांची कमाई केली. यामध्ये अंतिम पंघालने 53 किलो वजनी गटात सलग दुसऱ्या वर्षी जागतिक विजेतेपदावर आपले नाव कोरले. अशी कामगिरी करणारी अंतिम पहिली भारतीय महिला कुस्तीगीर ठरली आहे. या व्यतिरिक्त सविताने (62 किलो) सुवर्ण, अंतिम कुंडूने (65 किलो) रौप्य, तर आरजू (68 किलो), हर्षिता (72 किलो) आणि रीना (57 किलो) यांनी कांस्यपदक मिळवले. भारतासाठी तिसरे सुवर्णपदक प्रियाने (76 किलो) यापूर्वीच मिळवले होते.

हरियाणातील हिस्सार गावातील अंतिमने चिवटपणा, ताकद आणि भक्कम बचाव याचे सुरेख दर्शन घडवताना युक्रेनच्या मारिया येफ्रेमोवाचा 4-0 असा पराभव केला. मारियाने लढतीत अनेकवेळा अंतिमची पकड मिळवण्याचा प्रयत्न केला, पण अंतिमने एकदाही मारियाचा डाव यशस्वी होऊ दिला नाही. त्याउलट अंतिमने संधी मिळताच दुहेरी पट काढून मारियावर पकड मिळवली आणि आपल्या निर्विवाद वर्चस्वावर शिक्कामोर्तब केले. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत विजेतेपद मिळवूनही सुरुवातीला अंतिमला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र, विनेश फोगटने माघार घेतल्यावर आता अंतिमला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. अन्य लढतीत सविताने व्हेनेझुएलाच्या ॲस्ट्रिड पाओला चिरीनोसला असेच एकतर्फी लढतीत तांत्रिक गुणांच्या 10-0 वर्चस्वासह नमवून सुवर्णपदक मिळवले. अंतिम कुंडूला हंगेरीच्या एनिको एलेकेसविरुद्ध 2-9 अशी सुवर्ण लढतीत हार पत्करावी लागली. रीनाने कझाकस्तानच्या शुग्याला ओमीर्बेकचा 9-4 असा, तर हर्षिताने मोल्डोवाच्या एमिलिया स्रेसिउनचा 6-0 असा पराभव कांस्यपदक जिंकले.

ग्रीको-रोमनमध्ये अपयशी
ग्रीको-रोमन प्रकारात भारतीय कुस्तीगिरांना अपयश आले. अनिल मोरने (55 किलो) चांगली सुरुवात केली. मात्र, अनिलला उपांत्यपूर्व फेरीत किर्गिस्तानच्या नुरीस्टान सुईओरकुलोवविरुद्ध 6-7 असा पराभव पत्करावा लागला. संदीपला (63 किलो) पात्रता फेरीतच आव्हान गमवावे लागले.

Exit mobile version