रोहित-जडेजाची शतकं, मार्क वुडने बाद केले चार फलंदाज
| राजकोट | वृत्तसंस्था |
भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भारताने रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाच्या शतकाच्या जोरावर पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर उभारला आहे. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक चार फलंदाज बाद केले. पहिल्या डावाच्या फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी संयमी सुरूवात केली. अश्विनने झॅक क्राऊलची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला असला तरी दुसरा सलामीवीर बेन डकेटने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने 88 चेंडूत 100 धावा ठोकत इंग्लंडला 148 धावांपर्यंत पोहचवले.
भारताकडून रवींद्र जडेजाने 122 आणि कर्णधार रोहित शर्माने 131 धावांची खेळी केली. याशिवाय सर्फराज खानने 62 धावांचे, ध्रुव जुरेलने 46 धावांचे आणि रविचंद्रन अश्विनने 37 धावांचे योगदान दिले. शेवटी जसप्रीत बुमराहने 28 चेंडूत 26 धावांची खेळी केली. बुमराहने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. इंग्लंडकडून मार्क वुडने चार आणि रेहान अहमदने दोन फलंदाज बाद केले. तसेच जेम्स अँडरसन, टॉम हार्टले आणि जो रूट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला 331 धावांवर सहावा धक्का बसला. कुलदीप यादव 4 धावा करून जिमी अँडरसनचा बळी ठरला. यानंतर रवींद्र जडेजाला जो रूटने बाद केले. जडेजाने 225 चेंडूत 112 धावांची खेळी खेळली. यानंतर ध्रुव जुरेल आणि रवी अश्विन यांच्यात चांगली भागीदारी झाली. ध्रुव जुरेल 104 चेंडूत 46 धावा करून रेहान अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. रवी अश्विन 37 धावा करून रेहान अहमदचा बळी ठरला. जसप्रीत बुमराहने 26 धावांचे उपयुक्त योगदान दिले.
रविचंद्रन अश्विनने इंग्लंडला पहिला धक्का 89 धावांवर दिला. अश्विनने जॅक क्रॉलीला रजत पाटीदारकरवी झेलबाद केले. अश्विनचा कसोटीतील हा 500वा बळी ठरला. हा आकडा गाठणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. खरे तर फलंदाज बाद करण्याच्या बाबतीत अश्विनने अनिल कुंबळेला मागे टाकलेले नाही. पण सर्वात जलद 500 बळी घेणारा भारतीय होण्याच्या बाबतीत अश्विन कुंबळेच्या पुढे गेला आहे. अनिल कुंबळेने आपल्या 105व्या कसोटीत 500 बळींचा टप्पा गाठला. अश्विनने आपल्या 98व्या कसोटीत ही कामगिरी केली. एकूणच, संपूर्ण जगात सर्वात वेगवान 500 कसोटी बळींचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने 87 कसोटी सामन्यात हा पराक्रम केला आहे.
पहिल्या दिवशी रोहित शर्मानंतर सर्फराज चमकला याआधी भारतीय कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले होते. भारतीय कर्णधाराने 196 चेंडूत 131 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 14 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी सर्फराज खानने पदार्पणाच्या कसोटीत 62 धावांची संस्मरणीय खेळी केली.
रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील इंग्लंडच्या पहिल्या डावात रविचंद्रन अश्विनने जॅक क्रॉलीला बाद करत मोठा पराक्रम केला आहे. त्याने कसोटीत 500 बळी पूर्ण केले आहेत. हा पल्ला गाठणारा तो जगातील नववा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर तो भारताचा दुसरा आणि एकूण पाचवा फिरकी गोलंदाज आहे. अनिल कुंबळेच्या नावावर कसोटीत 619 बळी आहेत.