आफ्रिकेत फडकणार भारताचा झेंडा

जालनाकर धावणार जगप्रसिद्ध कॉम्रेड मॅरेथॉन

| जालना | वृत्‍तसंस्था |

प्रत्येक जण आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत असतो. कुणी यशस्वी होण्यासाठी, कुणी पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तर कुणी पैसे कमवण्यासाठी धडपडत असतात. मात्र आपल्या आजूबाजूला असंख्य ध्येयवेडेही असतात. जालना शहरातील जितेंद्र अग्रवाल हे देखील यापैकीच एक आहेत. मागील सहा वर्षांपासून ते वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. आता ते जगातील प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.

9 जूनला कॉम्रेड मॅरेथॉन
व्यायामाची तसेच खेळांची आवड असलेले अग्रवाल आतापर्यंत मुंबई, नाशिक, पुणे, सातारा येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. 42 किमी, 65 किमी आणि 75 किमी अंतराचे मॅरेथॉन स्पर्धा त्यांनी लिलया पार केल्या आहेत. येत्या 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत जालना शहरातून सहभागी होणारे ते पहिलेच धावपटू आहेत. देशभरातून 350 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणं हे एका धावपटूसाठी सन्मानाची बाब मानली जाते.
शाळेपासूनच खेळाची आवड
शाळेत असल्यापासूनच मला खेळाविषयी आवड होती. त्यामुळे लहानपणापासूनच मी खेळाडू राहिलो आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तसेच क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणं ही माझी आवड आहे. आजही दिवसातील सकाळी 3 तास जिम, रनिंग, सायकलिंग आणि स्विमिंग या गोष्टींसाठी देतो. मागील 6 वर्षांपासून नियमितपणे मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होत असून वेगवेगळ्या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा वेळेच्या आधी पूर्ण केल्या आहेत, असे अग्रवाल सांगतात.
कॉम्रेड मॅरेथॉन धावण्यासाठी अट
येत्या 9 जून रोजी दक्षिण आफ्रिका येथे कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत एकूण साडेतीन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. यापैकी आपल्या देशातून 350 स्पर्धक असणार आहेत. जालना शहरातून केवळ मी एकमेव असणार आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटूला 4 तास 50 मिनिटांत 42 किमींची मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणं गरजेचं असतं, असं जितेंद्र अग्रवाल यांनी सांगितलं.
व्यायाम शरीरासाठी गरजेचा
प्रत्येकाने आपल्या आरोग्याप्रती जागरूक राहून नियमितपणे व्यायाम करावा. तसेच योग्य तो आहार फॉलो करावा. ज्यामुळे निरोगी आरोग्य प्रत्येकाला मिळेल. प्रत्येकजण सुदृढ राहील, असं आवाहन अग्रवाल यांनी केलंय. दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे होणाऱ्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेबाबत आपण उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं. या स्पर्धेमध्ये 90 किलोमीटर अंतर केवळ 12 तासांमध्ये पूर्ण करावं लागणार आहे. मॅरेथॉनचे 90 किमी अंतर 11 तासात पूर्ण करण्याचे ध्येय असल्याचे अग्रवाल सांगतात.
Exit mobile version