| पुणे | प्रतिनिधी |
चीनमधील याबुली स्की रिसॉर्ट येथे सुरू झालेल्या ‘आयएसएमएफ आशियाई स्की माउंटेनियरिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरी केली.
आशियातील बलाढ्य देशांचा आव्हानाचा सामना करत भारतीय खेळाडूंनी ‘व्हर्टिकल रेस’ या कठीण प्रकारात पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या शर्यतीत शारीरिक क्षमता आणि तांत्रिक कौशल्याची कसोटी लागते. यात पुरुष गटात सिद्धार्थ गाडेकर याने सातवे, तर शार्दूल थपलियाल याने आठवे स्थान पटकावले. महिला गटात भारताची एकमेव प्रतिनिधी असणाऱ्या काम्या कार्तिकेयनने सातव्या स्थानावर झेप घेतली. आशियाई स्तरावरील स्पर्धेत प्रथमच एकावेळी भारताच्या तीन खेळाडूंनी पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे.
गाडेकर याने दुसऱ्या दिवशीदेखील एका प्रकारात सातवे, तर अन्य एका प्रकारात पाचवे स्थान पटकावले. गुलमर्ग येथील खेलो इंडिया विंटर गेम्समधील यशानंतर भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील आपली क्षमता सिद्ध केली आहे. स्कीमो इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष प्रवीण सूद यांनी यशाबद्दल समाधान व्यक्त केले. सूद म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून भारतात या क्रीडा प्रकाराचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय स्की माउंटेनियरिंग फेडरेशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खेळाडूंना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.






