चौथ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव
| रायपूर | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारताने 20 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करत भारताने 9 बाद 174 धावा केल्या होत्या. उत्तरादाखल ऑस्ट्रेलियाला 154 धावा करता आल्या. दोन्ही संघातील पाचवी आणि अखेरची टी-20 मॅच दि.3 रोजी बंगळुरू येते होणार आहे.
या विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील एक मोठा विक्रम नावावर केला. आता भारत टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक सामने जिंकणारा संघ झाला आहे. भारताने पाकिस्तानच्या टी-20 मधील 135 विजयांचा विक्रम मागे टाकला. ऑस्ट्रेलियावरील चौथ्या सामन्यातील विजय हा भारताचा आंतरराष्ट्रीय टी-20 मधील 136वा विजय ठरला.
भारताने दिलेल्या 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली होती. 40 धावांवर त्यांनी पहिला गडी गमावला. रवी बिश्नोईने जोश फिलिप माघारी पाठवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने गडी बाद होत राहिले. कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद 36 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर, दीपक चहरने 2, बिश्नोई आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्याआधी चौथ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने 5 तर भारताने संघात 4 बदल केले होते. भारताच्या डावाची सुरूवात यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांनी केली. या जोडीने पहिल्या गड्यासाठी 50 धावांची भागिदारी केली. जयस्वाल 28 चेंडूंत 37 धावा करून माघारी परतला. त्याच्या जागी आलेल्या श्रेयस अय्यरने निराशा केली. तो फक्त 8 धावांवर बाद झाला. तर, कर्णधार सूर्यकुमार फक्त 1 धावांवर माघारी परतला. यामुळे भारताची अवस्था 3 बाद 63 अशी झाली होती. चौथ्या गड्यासाठी ऋतुराज आणि रिंकू सिंह यांनी 48 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. ऋतुराजने 28 चेंडूंत 32 धावा केल्या. त्यानंतर रिंकू आणि जितेश शर्मा यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी धावांचा वेग वाढवला. शर्माने फक्त 19 चेंडूंत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 35 धावा केल्या. तर, रिंकू सिंहने 29 चेंडूंत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 46 धावा केल्या. अखेरच्या षटकात धावा करण्याच्या प्रयत्नात भारताने गडी गमावले. भारतीय संघाने 20 षटकात 9 बाद 174 अशी समाधानकारक धावसंख्या उभी केली.