बळी मिळविण्यासाठी सुर्या बिग्रेडची दमछाक
| दुबई | वृत्तसंस्था |
भारतीय संघाने आशिया चषक 2025 स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. सूर्यकुमार यादवच्या संघाने ‘अ’ गटातील शेवटच्या साखळी सामन्यात ओमानचा पराभव केला. यावेळी ओमानकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली. 200-250 धावांचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संघाला साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात ओमानने 188 धावांवर रोखले. मात्र, ओमानने शेवटच्या षटकापर्यंत फलंदाजी केली आणि फक्त 21 धावांनी पराभव स्विकारला. या स्पर्धेतील भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला आहे. आता अंतिम 4 च्या लढतीत भारताला रविवारी (दि.21) पाकिस्तानचा सामना करायचा आहे.
ओमानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलने डावाची सुरुवात केली; परंतु, गिल फक्त 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर संजू सॅमसनने संयमी खेळ करताना 56 धावा केल्या. अभिषेक शर्माने 38 धावा करताना संजूसह 66 धावा जोडल्या. त्यानंतर हार्दिक पंड्या देखील (1) स्वस्त्यात माघारी परतला. अक्षर पटेल (26) व तिलक वर्मा (29) यांनी चांगला खेळ केला. परंतु, त्यांना मोठ्या धावसंख्येत रूपांतरित करण्यात अपयश आले. त्यांच्यानंतर शीवम दुबे (5), हर्षीत राणा (13), अर्शदिप सिंह (1) व कुलदीप यादव (1) हे देखील मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. त्यामुळे 200-250 धावांचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संघाला ओमानने 8 बाद 188 धावांवर रोखले. यावेळी ओमानचे गोलंदाज शाह फैसल, जितेन रामानंदी आणि आमिर कलीम यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादव फलंदाजीसाठी न आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.
प्रत्युत्तरात ओमानचे सलामीवीर जतिंदर सिंग व आमीर कलीम यांनी चांगला खेळ दाखवला. मात्र, जतिंदर 32 धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर मोहम्मद मिर्झा आणि आमीर कलीम यांनी ओमानच्या डावाला चांगला आकार दिला. कलीमने 38 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ओमानला 30 चेंडूंत 73 धावा धावांची गरज असताना हम्मदने धडाकेबाज खेळ दाखवला. त्यामुळे भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागेल, अशी भीती चाहत्यांच्या मनात घर करू लागली होती. मात्र, त्याचवेळी हार्दिक पंड्याने सीमारेषेवर अविश्वसनीय झेल घेतला आणि कलीम 64 धावांवर माघारी परतला. 19व्या षटकात हम्मदने अर्धशतक पूर्ण केले आणि 51 धावांवर झेलबाद झाला. शेवटच्या शतकात ओमानला 34 धावांची गरज असताना त्यांनी आणखी एक गडी गमावला. त्यामुळे ओमानला 4 बाद 167 धावांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारताला हा सामना फक्त 21 धावांनीच जिंकता आला.
ग्रुप स्टेजमध्ये अव्वल
आशिया चषकातील 12व्या सामन्यामध्ये भारताने ‘अ' गटात ओमानला पराभूत करून सलग तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारताने ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचत आपला दबदबा दाखवला आहे. ‘अ' गटातील गुणतालिकेत भारताने 6 गुण मिळवले असून संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम ठरला आहे. तसेच, पाकिस्तान संघ 4 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर युएई दोन गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर असून ओमान एकही सामना न जिंकल्यामुळे चौथ्या क्रमांकावर राहिला आहे.
अर्शदीप सिंहचा भीमपराक्रम
या सामन्यात एक बळी घेऊन अर्शदीप सिंगने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अर्शदीप सिंगने ओमानविरुद्धच्या सामन्याच्या 20व्या षटकात विनायक शुक्लाचा बळी घेतला आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 बळी पूर्ण केले. टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. अर्शदीप सिंगने 2022 मध्ये भारतीय संघासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून तो भारतीय गोलंदाजी आक्रमणातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी 9 धावांत चार बळी अशी होती.







