दुसर्‍या कसोटीत भारताचा दणदणीत विजय

। बंगळूरु । वृत्तसंस्था ।
श्रीलंकेविरुद्धच्या दोन विजयांनिशी भारताने मालिकेतून 24 गुण कमावले असले, तरी जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत 77 गुण असतानाही 58.33 टक्क्यांमुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
तिसर्‍या दिवशी विजयासाठीच्या 447 धावांच्या अवघड लक्ष्यासह श्रीलंकेच्या संघाने 1 बाद 28 धावसंख्येवर दुसर्‍या डावाला पुढे प्रारंभ केला. पहिल्या दिवसापासून अनियमित उसळी आणि वळणार्‍या खेळपट्टीवर भारतीय मार्‍यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांचा प्रतिकार थिटा पडला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेने भारतीय गोलंदाजांचा शर्थीने सामना करीत 107 धावांची खेळी साकारली; पण चहापानानंतर 208 धावसंख्येवर भारताने श्रीलंकेच्या दुसर्‍या डावापुढे पूर्णविराम दिला.
श्रीलंकेकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणार्‍या डावखुर्‍या करुणारत्नेने जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीवर चौकार खेचूत कारकीर्दीतील 14वे कसोटी शतक साकारले. त्याने कुशल मेंडिसच्या (60 चेंडूंत 54 धावा) साथीने दुसर्‍या गडयासाठी 97 धावांची बहुमोल भागीदारी केली. अखेरीस बुमरानेच (3/23) करुणारत्नेचा त्रिफळा उडवला. मेंडिसने रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत अर्धशतक पूर्ण केले; पण रविचंद्रन अश्‍विनच्या चेंडूवर तो चकला आणि ऋषभ पंतने यष्टिचीत करण्याची संधी साधली. त्यानंतर करुणारत्नेने निरोशान डिक्वेलाच्या (12) साथीने पाचव्या गडयासाठी 55 धावांची भागीदारी केली; पण अक्षर पटेलने पंतच्या साथीने ही जोडी फोडली. त्यानंतर श्रीलंकेचा उर्वरित निम्मा संघ भारताच्या गोलंदाजांनी 48 धावांत तंबूत धाडला आणि विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
बुमराने या सामन्यात एकूण 47 धावांत 8 बळी मिळवले. पहिल्या डावात त्याने मायदेशात पहिल्यांदाच पाच बळी घेण्याची किमया साधली होती. श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात त्याच्यासह अश्‍विन (4/55), अक्षर पटेल (2/37) आणि जडेजा (1/48) यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.

Exit mobile version