| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारताने कॅनडावर 14-3 असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. जुगराज सिंगने चार गोल करत चमक दाखवली, तर इतर खेळाडूंनीही प्रभावी कामगिरी केली. आता भारताचा अंतिम सामना बेल्जियमशी होणार आहे.
शनिवारी (दि.29) झालेल्या सामन्याची सुरुवात नीलकांत शर्माने चौथ्याच मिनिटाला केलेल्या गोलने झाली. त्यानंतर 10व्या मिनिटाला राजिंदर सिंगने गोल केला. कॅनडाने लगेच प्रतिकार करत पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि 11व्या मिनिटाला ब्रेंडन गुरालिउकने गोल करत खेळ सामन्यात रंग भरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जुगराज सिंगने 12व्या आणि अमित रोहिदासने 15व्या मिनिटाला गोल करत भारताला 4-1 अशी आघाडी मिळवून दिली. पुढच्या सत्रातील 24व्या मिनिटाला राजिंदरने, 25व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने आणि 26व्या मिनिटाला जुगराजने आपला दुसरा गोल केला. 7-1 अशी भक्कम आघाडी मिळवल्यानंतरही भारत अडथळ्याविना पुढे जात होता; मात्र, तिसऱ्या सत्रात कॅनडाने आक्रमणात काही बदल केले आणि 35व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी स्ट्रोक मिळाला. मॅथ्यू सारमेंटोने संधीचे सोने करत पिछाडी 2-7 अशी कमी केली. परंतु, 39 व्या मिनिटाला जुगराजने हॅट्रिक पूर्ण केली. सेल्वम कार्तीने 43 व्या मिनिटाला गोल केला आणि भारताची आघाडी 9-2 अशी झाली. शेवटच्या सत्रात 6 गोल झाले. अमित रोहिदासने 46व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. 50व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर जुगराजने आणखी एक गोल केला. त्यानंतर कॅनडाकडून ज्योत्स्वरूप सिधूने पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल केला. त्यानंतर 56व्या मिनिटाला संजयने, 57व्या व 59व्या मिनिटाला अभिषेकने गोल केले. त्यामुळे भारताने 14-3 असा विजय मिळवला.







