भारताची यशस्वी ‘अग्नी’परीक्षा

2000 किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अग्नी मालिकेतील अत्याधुनिक क्षेपणास्त्र ‘अग्नी-प्राईम’ची सोमवारी सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी ओडिशाच्या किनार्‍यावर यशस्वी चाचणी घेण्यात आली. अग्नि क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. 4000 किलोमीटरच्या रेंजच्या अग्नि 4 आणि अग्नि 5 क्षेपणास्त्रांची सांगड घालून या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे.

या क्षेपणास्त्राची 200 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र लहान आणि वजनाने हलके आहे. तसेच ते आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. 2 स्टेज आणि सॉलिड इंधनवर आधारित अग्नि प्राइम क्षेपणास्त्राचा अ‍ॅडव्हान्स रिंग लेझर जायरोस्कोपवर आधारित नेव्हिगेशन यंत्रणेद्वारे वापर केला जातो. त्याची मार्गदर्शक प्रणाली इलेक्ट्रो मेकेनिकल अ‍ॅक्ट्यूएटरने सुसज्ज आहे. सिंगल स्टेज अग्नी 1 च्या उलट डबल स्टेज अग्नि प्राइम क्षेपणास्त्राचा रोड आणि मोबाईल लाँचर दोन्हीमधून वापर करता येऊ शकतो.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे अग्नि प्राइम हे कमी वजनाचे क्षेपणास्त्र आहे. पूर्वीच्या क्षेपणास्त्रांपेक्षा त्याची लांब पल्ला गाठण्याची क्षमता अधिक आहे. भारताने 1989 मध्ये मध्यम-श्रेणीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि 1 ची सर्वप्रथम चाचणी केली होती. अग्नि 1 ची जागा आता अग्नि प्राइम घेईल, अग्नि क्षेपणास्त्राच्या मालिकेची पाच क्षेपणास्त्रे भारताने यशस्वीपणे विकसित केली आहेत.

क्षेपणास्त्र निर्मिती क्षेत्रात भारताची मोठी झेप
अग्नी प्राईमच्या चाचणीवेळी संरक्षण संशोधन व विकास संघटनेशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि वैज्ञानिकांचे एक पथक उपस्थित होते. येत्या काही दिवसांत भारत आणखीन अनेक शक्तिशाली क्षेपणास्त्रांची चाचणी घेऊ शकणार आहे. क्षेपणास्त्रांच्या निर्मिती क्षेत्रात आता भारत पूर्णपणे स्वावलंबी झाला आहे. क्षेपणास्त्र तंत्रज्ञान किंवा इतर उपकरणांसाठी कोणत्याही इतर देशावर अवलंबून नाही. मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत भारतीय शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्रांची निर्मिती, त्यांचे भाग तयार करणे व त्यांचे तंत्रज्ञान स्वतः तयार करण्यास सुरुवात केली आहे.

Exit mobile version