भारताचा पाकिस्तानवर थरारक विजय

मोहित उल्वाचा विजयी चौकार; आशिया चषकावर उमटवली मोहोर

| अल अमेरात | वृत्तसंस्था |

19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद भारताच्या युवा संघाने जिंकले आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तावर एक गडी राखून थराराक विजय मिळवला आहे. त्यासोबतच गेल्यावर्षीच्या अंतिम सामन्यात झालेल्या आणि यावर्षीच्या साखळी सामन्यातील पराभवाचीही त्यांनी परतफेड केली. या सामन्यात आर्यवीर सेहवाग आणि लक्ष्य रायचंदानी यांच्या अर्धशतकानंतर मोहित उल्वाने शेवटी स्फोटक खेळ करत भारताला विजयापर्यंत पोहचवले.

19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (दि.14) भारत विरुद्ध पाकिस्तान संघात खेळवला गेला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून उस्मान खान आणि हयाम खान यांनी चांगली सुरुवात करताना सलामीला 62 धावांची भागीदारी केली. मात्र, हयाम काव्य पटेलच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक अन्वय द्रविडकडे झेल देत 21 धावांवर बाद झाला.त्यानंतर उस्मान खान आणि अब्दुल कादिर या दोघांनी शतकी भागीदारी केली. अखेर त्यांची 135 धावांची भागीदारी अर्जुन राजपूतने तोडली. यावेळी अब्दुल कादिरला 80 धावांवर माघारी परतावे लागले. त्यानंतरही उस्मानला कर्णधार फरहान युसफने साथ दिली. यादरम्यान, उस्मानने त्याचे शतकही पूर्ण केले आणि तो 107 धावांवर बाद झाला. त्यानंतर फरहान (60) आणि अहमद हुसैन (17) बाद झाले. त्यानंतर पाकिस्तानने झटपट गडी गमावले; मात्र, त्यांनी त्याधीच 300 धावा पार केल्या होत्या. हमझा झहूरने 10 धावा केल्या, तर हुसैन अब्बास दर (2), मोहम्मद सय्यम (7), नकाब शफिक (11) हे स्वस्तात बाद झाले. त्यामुळे पाकिस्तानने 50 षटकात 9 बाद 337 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना काव्य पटेलने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर चिगुरुपती वेंकटने 3 बळी आणि अर्जुन राजपूतने 1 बळी घेतला.

या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग यांनी डावाची सुरुवात केली. त्यांच्यात 95 धावांची भागीदारीही झाली. त्यानंतर आर्यवीरने अर्धशतकही केले. मात्र, रायचंदानी आणि आर्यवीर यांची रंगलेली भागीदारी अखेर 18 व्या षटकात तुटली. आर्यवीरने 58 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतरही लक्ष्यला व्हीके विनीत आणि अर्जुन राजपूत यांनी साथ देण्याचा प्रयत्न केला. परंतु, विनीत 24 धावांवर आणि अर्जुन 16 धावांवर बाद झाला. यशवर्झन चौहानही 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर एका बाजूने लक्ष्य लढत होता. परंतु, तोही 80 धावा करून बाद झाला. लगेचच आर्यन सावसानी (9) आणि काव्य पटेल (0) हे देखील स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मात्र मनल चौहान आणि मोहिल उल्वा यांनी चांगली लढत देत सामन्यात रोमांच भरला. त्यांनी शेवटी अत्यंत आक्रमक खेळी करत 57 धावांची भागीदारीही केली. त्यानंतर मनल 47 धावांवर असताना बाद झाला. मात्र, मोहित उल्वाने भारताच्या आशा कायम ठेवत 6 चेंडूत 8 धावा असे समीकरण तयार करून दिले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती. अशावेळी त्याने चौकार ठोकला आणि भारताला विजयापर्यंत पोहचवले. तो 49 धावांवर नाबाद राहिला. त्याला दुसऱ्या बाजूने चिगुरुपती वेंकटने दमदार साथ देत 11 धावा केल्या.

ज्युनिअर सेहवागची स्फोटक खेळी
या सामन्यान आर्यवीर सेहवागने आपल्या फलंदाजीने लक्ष वेधून घेतले. भारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा असलेल्या आर्यवीरने 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दमदार सुरुवात केली. कर्णधार लक्ष्य रायचंदानीसोबत त्याने पहिल्या बळीसाठी 95 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताच्या डावाला चांगला पाया मिळाला. या दोघांचा फॉर्म भारताला अंतिम सामन्यापर्यंत घेऊन आला. पाकिस्तानच्या गोलंदाजाने टाकलेला चेंडू आर्यवीरच्या हातावर आदळला, तरीही वेदनेसह तो मैदानावर उभा राहिला. त्याने 51 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या स्पर्धेतील ही त्याची चौथी 50+ धावांची खेळी ठरली. यावेळी आर्यवीरने 61 चेंडूंत 9 चौकारांसह 58 धावा केल्या.
Exit mobile version