प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारताची विजयी हॅट्ट्रिक

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय महिला संघाने ङ्गएफआयएचफ प्रो लीग हॉकीमधील दमदार कामगिरीत सातत्य राखताना शनिवारी सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली. त्यांनी स्पेनवर 2-1 अशी सरशी साधली. भुवनेश्‍वर येथील किलगा स्टेडियमवर झालेल्या या सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताला जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या स्पेनचा बचाव भेदण्यात यश आले. मात्र त्यांना याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. दुसर्‍या सत्रात स्पेनने जोरदार प्रतिहल्ला करताना 18व्या मिनिटाला आघाडी मिळवली. त्यांचा हा गोल मार्ता सेगूने केला. मात्र त्यांची आघाडी केवळ दोन मिनिटेच टिकू शकली. 20व्या मिनिटाला ज्योतीने गोल झळकावत भारताला 1-1 अशी बरोबरी साधून दिली.
तिसर्‍या सत्रात यजमान भारताला गोलच्या फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. चौथ्या सत्रात स्पेनच्या आक्रमणापुढे भारताच्या बचाव फळीला तग धरण्यात यश आले. बचाव फळीकडून प्रेरणा घेत भारताच्या मध्यरक्षक आणि आघाडीपटूंनी आपला खेळ उंचावला. 52व्या मिनिटाला वंदना कटारियाने मारलेला फटका स्पेनची गोलरक्षक अ‍ॅना कॅल्व्होने अडवला; पण चेंडू थेट नेहाकडे गेला आणि तिने गोल करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. अखेर नेहाचा हाच गोल निर्णायक ठरला. भारताने पहिल्या दोन सामन्यांत चीनला पराभूत केले होते. त्यामुळे भारताचा हा सलग तिसरा विजय ठरला.

Exit mobile version