भारताची विजयी घोडदौड सुरूच

अमेरिकावर सात गडी राखून विजय

। न्यूयॉर्क । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेट संघाने टी-20 विश्‍वकरंडकातील ‘अ’ गटातील लढतीत अमेरिका संघावर सात गडी राखून विजय मिळवला. सलग तिसर्‍या विजयासह भारतीय संघाने ‘सुपर आठ’ फेरीमध्ये प्रवेश केला आहे. अर्शदीप सिंग (4/9) व हार्दिक पांड्या (2/14) यांची प्रभावी गोलंदाजी व सूर्यकुमार यादव (नाबाद 50), शिवम दुबे (नाबाद 31) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताची विजयी घोडदौड सुरू आहे.

या सामन्यात मुंबईकर असलेला पण अमेरिका संघाकडून खेळत असलेल्या सौरभ नेत्रावळकर याने विराट कोहली (0) व कर्णधार रोहित शर्मा (3) यांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवून चमक दाखवली. विजयासाठी 111 धावा काढायच्या निर्धाराने मैदानात उतरल्यावर भारतीय संघाची सुरुवात धक्कादायक झाली. चांगली फलंदाजी करीत असलेल्या रिषभ पंतला सरपटी चेंडूने बाद केले. पहिल्या दहा षटकांत तीन बाद 47 धावा जमा झाल्या होत्या, ज्यावरून अमेरिकन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजीवर आणलेले दडपण कळू शकेल. मधूनच चेंडू खूप खाली राहत असल्याने धावा जमा करणे कठीण वाटत असताना सूर्यकुमारचा झेल नेत्रावळकरने सोडला. संघाला गरज असताना सूर्यकुमार आणि दुबेची जोडी जमली. अमेरिका संघाने दोन षटकांदरम्यान खूप वेळ घेतल्याने दंड बसून भारतीय संघाला पाच अतिरिक्त मोलाच्या धावा मिळाल्या. 17व्या षटकात सूर्यकुमारने ठेवणीतील फटके मारत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, नाणेफेक जिंकून रोहित शर्माने गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. सामना चालू झाल्यावर पहिल्याच चेंडूवर अर्शदीप सिंगने शायन जहांगिरला पायचित केले आणि शेवटच्या चेंडूवर अँड्रियस गौसला बाद केले. या सामन्यात कप्तानी करणारा अ‍ॅरोन जोन्सला कमी वेगाचा आखूड टप्प्याचा चेंडू टाकून हार्दिक पांड्याने चकवून झेलबाद करवले. सलामीला फलंदाजीला आलेला स्टीव्हन टेलर 24 धावांवर अक्षर पटेलने बाद केले. हार्दिक पांड्याने टाकलेल्या बाऊन्सरवर षटकार मारताना नितीश चुकला ते केवळ त्याबाजूची सीमारेषा लांब होती म्हणून. सिराजने नितीशचा पकडलेला झेल अफलातून होता. टाकलेल्या प्रत्येक षटकात अर्शदीप सिंगने भेदक मारा करून फलंदाजांना बाद करायचा सपाटा लावला होता. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने मिळून सहा फलंदाजांना बाद केल्याने 20 षटकांच्या अखेरीला अमेरिकन धावफलक आठ बाद 110 धावांवर रोखला गेला.

25 व्या सामन्यात भारताने अमेरिकेचा पराभव करून सुपर-8 साठी पात्रता मिळवली. या विजयासह टीम इंडियाचा सुपर-8 मध्ये 24 जून रोजी सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे.

मुंबईच्या सौरभचा विक्रम
अमेरीकेचा स्टार वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकरने भारताविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली. या सामन्यात सौरभने विराट कोहलीविरुद्ध एक खास विक्रमही केला आहे. त्याने भारताची रन मशिन विराट कोहलीला शुन्यावर बाद केले. सौरभने पहिल्याच चेंडूवर विराटला क्षेत्ररक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले. आता आयसीसी स्पर्धेत कोहलीला गोल्डन डकवर बाद करणारा सौरभ पहिला गोलंदाज ठरला आहे. यानंतर पुढच्याच षटकात सौरभने मुंबईकर रोहित शर्मालादेखील पॅव्हेलियनची वाट धरायला लावली.
अर्शदीपने रचला इतिहास
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने टी-20 विश्‍वचषकात इतिहास रचला आहे. रोहितने पहिले षटक टाकण्याची जबाबदारी अर्शदीप सिंगवर सोपवली. या पठ्ठ्यानेदेखील पहिल्याच चेंडूवर बळी घेत भारताला धडाकेबाज सुरूवात करून दिली. विशेष म्हणजे टी-20 विश्‍वचषक इतिहासात सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा अर्शदीप सिंग हा भारताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
Exit mobile version