एकदिवसीय मालिकेत विंडिजचा व्हाईटवॉश; दीप्ती शर्माची अष्टपैलू भूमिका
। वडोदरा । वृत्तसंस्था ।
भारत आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांमध्ये वडोदरा येथे 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आयोजित करण्यात आली होती. त्यातील शेवटचा सामना शुक्रवारी (दि.27) रोजी खेळवला गेला. भारतीय संघाने पहिले 2 सामने जिंकून आधीच मालिका खिशात घातली होती. आता संघाने शेवटचा सामनाही जिंकून वेस्ट इंडिजचा 3-0 असा व्हाईटवॉश केला आहे.
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजचा संघ मोठ्या धावा करू शकला नाही. संपूर्ण संघ 38.5 षटकात 162 धावांवर सर्व बाद झाला. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने 28.2 षटकांत 5 गडी राखून 167 धावा करून विजय मिळवला आहे. भारताची फिरकी अष्टपैलू दीप्ती शर्माच्या घातक गोलंदाजीने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ती आता भारतासाठी एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक वेळा 5 बळी घेणारी गोलंदाज बनली आहे.
दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजची सुरुवात खूपच खराब झाली. त्यांचे पहिले 3 बळी केवळ 9 धावांवर गेले होते. भारताच्या रेणुका सिंगने सलामीवीर कियाना जोसेफ आणि कर्णधार हेली मॅथ्यूजला खातेही उघडण्याची संधी दिली नाही. तिने डायंड्रा डॉटिन (5) हिला आपला तिसरा बळी बनवले. येथून वेस्ट इंडिजचा डाव सांभाळण्याचे काम शमीन कॅम्पबेल आणि चिनेल हेन्री या जोडीने केले. या दोघींनी चौथ्या बळीसाठी 91 धावांची भागीदारी केली. कॅम्पबेलने 46 धावा केल्या आणि अर्धशतकाच्या जवळ आल्यावर ती बाद झाली. तर, हेन्री अर्धशतक झळकावण्यात यशस्वी ठरली. तिने 61 धावांची खेळी खेळली. या दोघी बाद झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव पुन्हा एकदा अडखळला. आलिया अॅलन (21) वगळता उर्वरित फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले. या कारणामुळे त्यांचा डाव 39व्या षटकातच संपला. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 6 आणि रेणुका सिंगने 3 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खास झाली नाही. शानदार फॉर्मात असलेली सलामीवीर स्मृती मंधाना अवघ्या 4 धावा करून बाद झाली. त्याचवेळी, गेल्या सामन्यातील शतकवीर हरलीन देओलच्या बॅटमधून फक्त 1 धाव आली. प्रतिका रावलही 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 7 चौकार मारत 32 धावांची खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्जच्या बॅटमधून 29 धावा आल्या. यानंतर दीप्ती शर्माने नाबाद 39 आणि ऋचा घोषने नाबाद 23 धावा करत संघाला विजयापर्यंत नेले.