। तळा । वार्ताहर ।
तळा शहरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. तारणे येथील लक्ष्मण पतारी हे तळा मांदाड रस्त्यावर उतरले असता त्यांच्यावर अचानक तीन ते चार कुत्र्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात लक्ष्मण पतारी हे अक्षरशः खाली कोसळले. सुदैवाने त्याच ठिकाणी असलेले सामाजिक कार्यकर्ते गुरुदास तळकर यांनी त्यांची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
तळा बाजारपेठ परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून या भटक्या कुत्र्यांच्या टोळीने शहरात अक्षरशःउच्छाद मांडला आहे. काही कुत्री येणा-जाणाऱ्या माणसांचा व वाहनांचा भुंकत जाऊन पाठलाग करत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लहान मुले आबालवृद्ध, वाहनचालक, दुचाकीस्वार यांच्या अंगावर धावून जखमी करण्याचे प्रकारही काही वेळा घडले आहेत. या भटक्या कुत्र्यांबाबत वारंवार कळवूनही तळा नगरपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. तळा नगरपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांबाबत कारवाई करून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी तळावासीयांकडून करण्यात येत आहे.