उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचे निधन

| मुंबई | प्रतिनिधी |

प्रसिद्ध उद्योगपती आणि रेमंड समूहाचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया यांचे शनिवारी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे भारतीय उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. रविवारी मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत दुपारी 3 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विजयपत सिंघानिया यांनी रेमंडला घराघरात पोहोचवून जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात सिंघानिया यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ते केवळ यशस्वी उद्योगपतीच नव्हते, तर एक धाडसी वैमानिक म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी मायक्रोलाइट विमानातून यूके ते भारत असा ऐतिहासिक प्रवास केला होता तसेच हॉट एअर बलूनद्वारे सर्वाधिक उंची गाठण्याचा जागतिक विक्रमही त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारतर्फे त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तसेच भारतीय हवाई दलाकडून मानद एअर कमांडर पदवी देण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version