| उरण | वार्ताहर |
वातावरणातील बदलांमुळे तसेच डासांच्या प्रादुर्भावामुळे उरणमध्ये संसर्गजन्य आजार वाढले आहेत. मलेरिया, ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, डेंग्यू सारख्या आजारांनी उरणकरांना ग्रासले आहे. या आजारांवर उपचार करुन घेण्यासाठी रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच खासगी रुग्णालयात गर्दी करत आहेत. त्यामुळे उरणमधील रुग्णालये हाऊसफुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या पावसाळा सुरू असून कधी सतत पाऊस तर कधी ऊन पडत आहे. त्यामुळे सतत वातावरणात बदल होत आहे. तसेच, स्थानिक ग्रामपंचायत व सिडको प्रशासनाने गटारांची साफसफाई कागदावर रेखाटण्यापुर्तीच केल्याने मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले जाते. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे मलेरिया, डेंगू सारखे आजार होत आहेत. त्याबरोबर संसर्गजन्य रोगांमध्ये देखील वाढ होत आहे. त्यामध्ये ताप, सर्दी, खोकला, घसादुखणे असे विविध आजार डोके वर काढत आहेत. अशा आजारांवर उपचार करुन घेण्यासाठी रुग्ण हे उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच प्रत्येक गावातील आणि शहरातील खासगी रुग्णालयात ये-जा करत आहेत.
उरण ग्रामीण रुग्णालयात दिवसागाणीत 250 रुग्ण उपचार घेत आहेत. तर, प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली येथे ग्रामीण भागातील दिवसागणित 120 रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच, आपापल्या परिसरातील गावागावतील दवाखान्यातही मोठ्या संख्येने रुग्ण उपचार घेत आहेत.जूनपासून आतापर्यंत इंदिरा गांधी रुग्णालयात सुमारे साडेपाच हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास 3 हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. त्यातच चिकन गुनिया बरोबरच मलेरियाचे 22 आणि डेंग्यूचे 25 संशयित रुग्ण आहेत.
उरणमधील रुग्णालये हाऊसफुल्ल
