नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तहसीलदारांना निवेदन
| सुधागड-पाली | गौसखान पठाण |
पाली शहरातील अनेक रेशन दुकानांमध्ये सध्या लाभार्थ्यांना लेंडीयुक्त, निकृष्ट दर्जाचा गहू वाटप केला जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरीब व गरजू नागरिकांना मोफत धान्य पुरवठा केला जातो, मात्र मिळणाऱ्या गव्हाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
गहूमध्ये लेंड, कचरा, दगड, कीड लागलेले दुर्गंधीयुक्त धान्य आढळत असल्याने अनेक लाभार्थ्यांनी रेशन दुकानदारांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. काही ठिकाणी गहू वापरण्यायोग्य नसल्यामुळे नागरिकांनी तो परत करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला मिळणाऱ्या गव्हातून चपाती बनवणे कठीण झाले आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय, अशी प्रतिक्रिया एका शिधापत्रिकाधारक महिलेने व्यक्त केली. या प्रकारामुळे पाली शहरातील विविध भागांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, नागरिकांनी प्रशासनाकडे लेखी तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी रेशन दुकानांवर जाब विचारण्यात आला असून, शासन मोफत धान्य देत असले तरी त्याचा दर्जा जर वापरण्यायोग्य नसेल, तर तो लाभ नव्हे तर त्रास ठरतो, असा सूर नागरिकांमध्ये आहे.
मात्र, या संपूर्ण प्रकारात दोष केवळ दुकानदारांचा नाही. धान्य वितरणापूर्वी गुणवत्ता तपासणी करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी हे निकृष्ट धान्य मंजूर कसे केले? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. नागरिकांचा ठाम सूर आहे की, असे धान्य जनावरांनाही खाण्याच्या लायकीचे नाही, आणि माणसाला देणे म्हणजे आरोग्याशी थट्टा आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार यांना निवेदन दिले असून, सुधागड तालुक्यातील सर्व रेशन दुकानांची तातडीने तपासणी व्हावी आणि निकृष्ट धान्य वितरित होण्यामागील शासकीय यंत्रणेतील त्रुटींची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित धान्य मिळावे, हीच अपेक्षा आता प्रशासनाकडे आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी एकमुखी मागणी पालीकरांकडून होत आहे.







