रस्त्याच्या नूतनीकरणात पायाभूत सुविधांची दुरवस्था

संतप्त सार्तिर्डे ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा

। रेवदंडा । प्रतिनिधी ।

मुरूड तालुक्यातील साळाव ते तळेखार या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू असताना, या मार्गावरील गावांच्या अंतर्गत रस्त्यांसह पाणीपुरवठा पाइपलाइन आणि बसथांब्यांची दुरवस्था झाल्याची तक्रार ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत सार्तिर्डे येथील ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

साळाव ते तळेखार या मुख्य रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे दिसून येत आहे. वळके ग्रामपंचायत हद्दीतील सार्तिर्डे येथील मुख्य रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, मुख्य रस्त्यावरील पूर्वीचा चढाव कमी करण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे गावातील बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. परिणामी, प्रवाशांना बसथांब्यावर जाण्या-येण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत असून, बसथांबा असूनही त्याचा योग्य वापर करता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

याशिवाय सार्तिर्डे गावात जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याचीही नूतनीकरणाच्या कामात दुरवस्था झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनचेही कामादरम्यान नुकसान झाल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. मुख्य रस्त्याचे काम करताना गावातील मूलभूत सुविधांची योग्य काळजी घेण्यात आली नसल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सार्तिर्डे येथील अंतर्गत रस्ता, पाणीपुरवठा पाइपलाइन आणि बसथांब्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराकडे केली आहे. मात्र, या मागणीला प्रतिसाद मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी
साळाव ते तळेखार मार्गावरील सार्तिर्डेसह शिरगाव, मिठेखार आदी गावांमध्येही मुख्य रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या कामामुळे विविध समस्या निर्माण झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन नुकसान झालेल्या सुविधांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
Exit mobile version