| कर्जत | प्रतिनिधी |
युनायटेड वे मुंबई संस्थेद्वारा जल संजीवनी प्रकल्प कर्जत तालुक्यातील आदिवासीबहुल दुर्गम भागातील खांडस, पाथरज, अंभेरपाडा, नांदगाव आणि वारे ग्रामपंचायतीमधील 42 गावांत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाचा उद्देश गावांचा सर्वांगीण विकास करणे असून, त्यात पिण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी पाणी उपलब्धता करून त्याचा इष्टतम वापर करणे (सूक्ष्म सिंचन वापर इ.), तसेच शाश्वत शेती अंतर्गत हवामान बदलामुळे शेतीवर होणार्या दुष्परिणामांना कमी करून शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून राहणीमान उंचावणे, वैयक्तिक आणि स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे आहे.
याचाच एक भाग म्हणजे दि. 20 मार्च रोजी कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायत हद्दीतील चाफेवाडी नदीवरील सिमेंट नाला बंधारा दुरुस्तीकरण कार्याचे भूमीपूजन महिला सरपंच ताई कचरू पादीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत खांडसचे सदस्य अनिल हिंदोळा, प्रकाश ऐनकर, किसन खंडवी, प्रगतीशील शेतकरी जगन पादीर, गाव विकास समिती चाफेवाडीचे सदस्य वैशाली हिंदोळा, दिलीप खंडवी. गाव विकास समिती वडाचीवाडी सदस्य तुकाराम हिंदोळा, अर्जुन खंडवी तसेच इतर ग्रामस्थ देवजी लोभी, दुंदा पोसाटे, हिरामन शिंगवे उपस्थित होते.
याप्रसंगी युनायटेड वे मुंबई जल संजीवनी प्रकल्पाचे सोशल एक्स्पर्ट विवेक कोळी यांनी सदर बंधारा दुरुस्त करण्याची पार्श्वभूमी मांडली त्यात चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मेंगाळवाडी, इष्टे जांभूळवाडी आणि पादीरवाडी अशा एकूण सहा वाड्यांना याचा फायदा होईल. सदर सिमेंट नाला बंधारामुळे एकूण 114900 घन मी.पाणी अडून जमिनीत संवर्धन होईल ज्याचा लाभ 300 पेक्षा जास्त कुटुंबातील जवळपास 1450 लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होईल, तसेच शेतीसाठी दुसरे आणि तिसरे संरक्षित सिंचन शक्य होईल जेणेकरून पीक उत्पादकतेमध्ये जवळपास 30-35 टक्के वाढ होण्यास मदत होईल. एकूण 1000 एकर पेक्षा जास्त क्षेत्रातील जमिनीची आद्रता 20-30 टक्के वाढण्यास मदत होईल. याप्रसंगी फिल्ड ऑफिसर संतोष काठे यांनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात परिश्रम घेतले.