प्रत्येक ग्रामपंचायतीने दहा सांडपाणी बंधारे बांधावेत; सभापती विलास यशवंत शिंदे यांचे आवाहन
| माणगाव | प्रतिनिधी |
भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजना हाती घेण्याची गरज ओळखून पंचायत समिती माणगावचे सभापती विलास यशवंत शिंदे यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना प्रत्येक गावात किमान दहा वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन केले आहे.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला लोकसहभागाची जोड देत गावागावांत जलसंधारणाची कामे करण्यावर त्यांनी भर दिला आहे. सभापती शिंदे यांनी 7 ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच व प्रशासनाला हे आवाहन केले आहे. पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे, उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करणे आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ‘वॉटर बजेट’ अर्थात पाण्याचे अंदाजपत्रक तयार करून गावातील पाण्याची उपलब्धता आणि गरज यांचा विचार करावा. ग्रामपंचायत क्षेत्रात वनराई बंधारे, कच्चे बंधारे आणि इतर जलसंधारणाच्या उपाययोजना राबवून किमान दहा बंधारे उभारण्याचे नियोजन करावे, असे आवाहन पत्रात करण्यात आले आहे.
