महामार्गावर जखमी अवस्थेत मगर

वन्यजीवांना मुसळधार पावसाचा फटका

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसाचा फटका वन्यजीवांना बसत आहे. रविवारी (दि.17) रात्री मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथील राऊत सर्जिकल हॉस्पिटलच्या समोर जखमी अवस्थेत मगर आढळून आली.

एका नागरिकाने ही मगर मुंबई गोवा महामार्गाच्या शेजारील साठलेल्या पाण्याच्या डबक्यात पाहिली. त्याने स्थानिक वन्यजीव रक्षक शंतनू कुवेसकर यांना याची माहिती दिली. शंतनू कुवेसकर यांनी वनविभाग व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेचे सदस्य यांना लागलीच ही माहिती दिली. वनविभाग व वन्यजीव रक्षक यांनी मगरीला रात्री दहा वाजता सुरक्षित पकडले. या मगरीची लांबी साधारण चार फूट होती. मगरीच्या अंगावरून अज्ञात वाहन जाऊन मगरीला दुखापत झाली होती. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.

Exit mobile version